AHMEDNAGAR ZP ः अहमदनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी 100 टक्के मतदानाची भूमिका बजवावी. याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आणि मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने “मिशन 13 मे – सण मतदानाचा” या नाविन्यपूर्ण सहा स्पर्धांचा समावेश असलेल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी सहभागी व्हावे आणि मतदानामध्ये देखील सहभागी व्हावे, असे आवाहन स्वीप समितीने केले आहे.
निबंध,चित्रकला, कविता,घोषवाक्य,पोस्टर,मतदान प्रबोधनात्मक व्हिडिओ (लघुपट /माहितीपट) निर्मिती; अशा स्वरूपाच्या सहा प्रकारच्या स्पर्धा एकूण चार गटात या स्पर्धा संपन्न होणार आहेत. या सर्व स्पर्धांसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते पदवीधर आणि खुला गट, असे चार गट आहेत. विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
निबंध स्पर्धेसाठी मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य, लोकशाही आणि मतदानाचा हक्क, चला मतदानाला, मतदार राजा जागा हो आणि माझे आई-वडिल मतदानाला जाणारच!, असे विषय राहतील.
घोषवाक्य व कविता स्पर्धेसाठी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मी अहमदनगर आहे-मी माझ्यासाठी मतदान करणार, छोडकर अपने सारे काम, चलो करो पहिले मतदान, असे विषय राहतील.
चित्रकला व पोस्टर स्पर्धेसाठी मतदान केंद्र- भारताचे शक्तिस्थान, मतदार जनजागृती, अहमदनगरच्या मतदार राजा जागा हो, १३ मे ला लोकशाहीचा धागा हो, असे विषय राहतील.
सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या साहित्यावर स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता ,फोन नंबर व गटाचा उल्लेख करून आपले स्पर्धेतील साहित्य 30 एप्रिल 2024 पर्यंत जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभाग, अहमदनगर या ठिकाणी समक्ष/पोस्टाने/कुरिअरद्वारे जमा करावयाचे आहे. तसेच वरीलपैकी कुठल्याही एक विषयावर व्हिडिओ व लघुपट निर्मिती करावयाची असून देशातील पहिल्या अहमदनगर स्वीप केअर असलेल्या 9002 10 9003 या व्हाट्सअप क्रमांकावर व्हिडिओ आणि लघुपट पाठवायचे आहेत.
शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक यांनी या “मिशन 13 मे- सण मतदानाचा!” उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, तहसीलदार प्रदीप पाटील, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांनी केले आहे.