अहमदनगरमधील सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेले चार विषारी साप निसर्गात मुक्त केले आहे. हे साप साराेळा आणि आगडगाव (ता. नगर), मेहेकरी आणि काेल्हार (ता. पाथर्डी) इथं पकडले हाेते. यात विषारी काळा कोब्रा, घोणस, धामण सापांचा समावेश हाेता.
हे साप रहदारीच्या ठिकाणी वावरत हाेते. त्याची माहिती सर्पमित्र बेरड यांना स्थानिकांनी दिल्यावर त्यांनी तिथं जावून ते पकडले. यानंतर त्यांना निसर्गात मुक्त करण्यात आले. विषारी काळा कोब्रा 6 फुटी, घोणस 5 फुटी, धामिण दोन 8 फुटी लांबीचे होते. विषारी काळा कोब्रा, घोणस आणि धामिन सापांची लांबी पाहून उपस्थितांना धडकी भरली हाेती.
विषारी काळा कोब्रा साप हा दुर्मिळ असून सहजासहजी आढळत नाही. हा साप सर्वात जास्त विषारी आहे. त्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. जागतिक सर्प दिनाचे औचित्य साधून कृष्णा बेरड पाटील यांनी वनरक्षक अर्जुन खेडकर आणि वनपाल शैलेश बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे साप निसर्गात मुक्त केले. अर्जुन खेडकर, शैलेश बडदे, भाऊ भिंगारदिवे, अंकित चव्हाण, ओम जंगम, सरवर खान आदी उपस्थित होते.
सर्पमित्र बेरड म्हणाले, “यावर्षी काळा कोब्रा, घोणस, धामिण, अजगर आणि मन्यार सर्प जातीमध्ये वाढ झाली आहे. पावसाळ्यात ते जास्त प्रमाणात बाहेर पडत असून नागरिकांनी कोठेही सर्प आढळल्यास त्यांना मारू नये. त्यांना निसर्गात मुक्त फिरून द्यावे”.