भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित अहमदनगर शहरातील जन शिक्षण संस्थेत क्षमता बांधणी कार्यशाळातंर्गत विविध प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर बालाजी बिराजदार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.
‘महिला चिकाटी व जिद्दीने उद्योग, व्यवसायात आपले कर्तृत्व निर्माण करत आहे. महिलांना नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग-व्यवसायात अडचणी येतात, त्यावर मात करून पुढे गेल्यास यश निश्चित आहे’, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर बालाजी बिराजदार यांनी केले. जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, जिल्हा उद्योग केंद्राचे आप्पासाहेब बडे, ज्ञानेश्वर खेडकर आदीसह प्रशिक्षणार्थी युवती व महिला उपस्थित होत्या.
बिराजदार म्हणाले, “परिपूर्ण माहिती घेऊन महिलांनी उद्योग, व्यवसायात उतरावे. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना असून, त्याचा लाभ घेतल्यास मोठा आधार मिळणार आहे”. उत्पादन उद्योग व सेवा उद्योग याची सविस्तर माहिती घेऊन त्याचा अभ्यास करावा व समाजातील गरजा ओळखून सेवा दिल्यास तो उद्योग, व्यवसाय बहरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब पवार यांनी युवतींनी शिक्षण घेऊन घरात बसू नये, स्वत:मध्ये असलेल्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व स्वत:चे कर्तृत्व सिध्द करण्यासाठी उंबरठा ओलांडावा. आई-वडिलांनी घरी बसण्यासाठी मुलींनी शिक्षण दिले नसून, सावित्रीच्या लेकींना कर्तृत्व सिध्द भरारी घ्यावी, असे सांगितले.
राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शफाकत सय्यद यांनी प्रास्ताविक केले. असिस्टंट ड्रेस मेकर, ब्युटी केअर असिस्टंट व भरत काम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवती व महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. आयटीआय उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शुभांगी देशमुख, स्नेहल अनमल यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ममता गड्डम यांनी सूत्रसंचालन केले. रेणुका कोटा यांनी आभार मानले.