प्रत्येक बालकांच्या अंगी सुप्त गुणांचा खजिना असतो बालकांच्या सर्वांगीण विकासामध्ये पूर्व बाल्यावस्थेला खूप महत्व आहे. पूर्व बाल्यावस्थेचा काळ हा 2 ते 6 वर्षांपर्यंत मानला जातो. या प्रत्येक अवस्थेची ठळक वैशिष्ट्ये असतात. कुटुंबातून बाहेर पडून शाळेच्या व्यापक क्षेत्रात बालक प्रवेश करते. बाल्यावस्थेत देखील मुलांमध्ये आपल्याला काही वैशिष्टये दिसून येतात. घरातील आणि घराबाहेरील अशा दोन्ही वातावरणाचा मुलांच्या विकासावर निश्चितच परिणाम होत असतो.
मूल जेव्हा चालणे-बोलणे तसेच शाळेत जाऊ लागले कि, बालसंगोपन संपले, असा अनेक पालकांचा गैरसमज असतो. पण प्रत्येक कुटुंबातील आई-वडील आणि शालेय शिक्षक यांनाही या बालसंगोपनाची माहिती असावी लागते. कारण प्रत्येक बालकांच्या सर्वांगीण विकासात या सर्वांचा सक्रिय हातभार लागतो. मुखतः हातभार लागणे आवश्यक ठरते. कारण प्रत्येक बालकाच्या सामाजिक, शारीरिक , मानसिक आणि भावनिक विकासाची दिशा आणि दर्जा या संगोपनावर अवलंबून असतो. अनेक बालकांमध्ये विकास प्रक्रिया अगदी हळूवार होत असल्याचे दिसते. यालाच बालकांमधील विकास विलंब प्रक्रिया, असे म्हटले जाते. विकासात्मक विलंब अशा मुलाचा संदर्भ देते ज्याने त्याच वयाच्या इतर बालकांच्या तुलनेत त्याच्याकडून किंवा तिच्याकडून अपेक्षित विकासात्मक कौशल्ये प्राप्त केलेली नाहीत. (Ref. Home Economics – Child Development)
पूर्व बाल्यावस्थेची काही वैशिष्ट्ये : अनुकरण करणे, भाषा विकास, प्रश्न विचारणे, जिज्ञासू वृत्ती, खेळण्याचे वय, शाळा पूर्व वय आणि योग्य आणि अयोग्य वर्तन.
त्याचप्रमाणे स्नायूद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व क्रिया म्हणजे कारक क्षमता होय. या क्रियांवर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजेच कारक विकास होय. शारीरिक व कारक विकास हे परस्परावलंबी आहेत. स्नायूंचा विकास होत असताना स्नायू परिपक्वव होतात. यामुळे स्नायूशी निगडित सर्व क्रिया करण्यास मुलं शिकतात. तिच क्रिया वारंवार करून त्यात कौशल्य प्राप्त करतात. या गोष्टी करण्यास मुलांना प्रोत्साहन दिल्यास कारक विकास जलद होण्यास मदत मिळते.
बालकांचे शरीर लवचिक असल्याने वेगवेगळ्या शारीरिक क्रिया संबधीत कौशल्य मुले लवकर शिकतात. त्यासाठी स्नायूंचे परिपक्वन होणे महत्वाचे असते. सूक्ष्म स्नायूंच्या क्रियांवर मुली मुलांपेक्षा लवकर ताबा मिळवितात. बालकाच्या सर्वांगीण विकासात नैतिक विकासाला महत्वाचे स्थान आहे.आदर्श व्यक्ती म्हणून समाजात मनाचे स्थान मिळवावे, असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते. तसे वर्तन मुलांनी अंगी बागावे म्हणून त्यांचे लहानपणापासून सतत प्रयन्त सुरु असतात.
निरीक्षणाद्वारे मुलाचे व्यक्तिमत्व घडत असते हे व्यक्तिमत्व चांगले किंवा वाईट समाजमान्य आहे किंवा समाजविरोधी आहे. हे सर्वच बालक ज्या वातावरणात राहतात त्यावर अवलंबून असते. मुलाची जसजशी शारीरिक व मानसिक वाढ होत असते. तसतसा त्याचा नैतिक विकास देखील होत असतो. पूर्व बाल्यावस्था हे शारीरिक कौशल्य शिकण्याच्या दृष्टीने आदर्श वय असते कारण मुलांचा कारक विकास चांगला व योग्य प्रकारे व्हावा यासाठी योग्य पालक समुपदेशन, मार्गदर्शन प्रेरणा व संधी मुलांना उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे.
बालकांच्या सर्वांगीण विकासात नैतिक विकासाला महत्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. बालक हा समाजाचा घटक असतो बालकाला आपले दैनंदिन व्यवहार करताना कुटुंब सदस्य, शेजारी, जवळचे मित्र, समवयस्क बालके, शिक्षिका यांच्याशी योग्य प्रकारे समायोजन साधण्यास शिकवले जाते. त्याप्रमाणे बालक आपले वर्तन समाजमान्य करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला चांगले म्हणावे ही आंतरिक इच्छा नैतिक विकासाची पायाभरणी करण्यास पूरक ठरते.
संकलन : दीपक बनसोडे, संशाेधक विद्यार्थी, पुणे