अहमदनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेवस्ती (ता. नेवासा) या ठिकाणी आजी-आजोबा दिन मोठ्या उत्साहात झाला. वस्तीवरील प्रत्येक कुटुंबातील आजी-आजोबांना शाळेमध्ये आदरपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते. आलेल्या आजी-आजोबांचे विद्यार्थ्यांनी औक्षण केले. आजी-आजोबांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन आजी-आजोबांचे आशीर्वाद घेतले.
संस्कारक्षम पिढी कशी असावी, यासंदर्भात आजी-आजोबांनी लाडक्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या पिढीवर चांगले संस्कार होण्यासाठी आजी-आजोबा यांचे मार्गदर्शन हवे असते, असे मत शाळेचे मुख्याध्यापक देविदास कचरे यांनी मांडले. दैनंदिन धकाधकीच्या जीवनामधून थोडासा विरंगुळा मिळावा या अनुषंगाने आजी-आजोबांचे शाळेमध्ये संगीत खुर्ची, बादलीत चेंडू फेकणे, फुगडी, असे आनंददायी खेळ घेण्यात आले. हिराबाई अशोक चेडे, बंडू सूर्यभान तांबे हे आजी-आजोबा विजयी ठरले. प्रत्येक आजी-आजोबाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
गणपत मुंगसे, बाळासाहेब मुंगसे, चांगदेव तांबे, कचरू तांबे, रामकीसन तांबे, अशोक औटी, तुळशीराम तांबे, उद्धव औटी, निवृत्ती तांबे, राजेंद्र मुटकुळे, कडूभाऊ तांबे, बंडू तांबे, संगीता तांबे, आशा तांबे, वेणूबाई तांबे, हिराबाई चेडे, अनिता तांबे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावता तरुण मंडळ व तांबेवस्ती वरील सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. शिक्षक शैलेश खनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.