अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील श्रीमंत बाजाराचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील गुंतवणुकदारांच्या ठेवी परत मिळावे आणि या कंपनीत गुंतवणूक करायला लावणाऱ्या पारनेर शहरातील महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात याप्रकरणी कारवाई न झाल्यास विशेष पोलिस महानिरीक्षक (नाशिक) यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील एका नावाजलेल्या संस्थेतील महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य यांनी संगनमत करून श्रीमंत बाजार ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) यांच्या माध्यमातून दोन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. गुंतवणूकदारांना परताव्याचे आमिष दाखवून, शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर कमिशन व भेट म्हणून अलिशान गाड्या मिळाल्या. या दोघांमुळे अनेक जणांचे प्रपंच उध्वस्त झाले असून, पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांना आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पारनेर शहरासह तालुक्यात पुणे येथील या कंपनीचा म्होरक्या यांच्या मदतीने पारनेरचा नामांकित महाविद्यालयाचा वाघाने श्रीमंत बाजाराचा मास्टरमाइंड असल्याची चर्चा आहे. या कंपनीने पारनेर तालुक्याच्या महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक यांच्यासह माध्यमिक, प्राथमिक शिक्षक व व्यावसायिकांना जवळपास 100 कोटी रुपयांचा गंडा घातलेला आहे. पारनेर शहरासह सुपा, वाडेगव्हाण, शिरूर, कान्हूरपठार, टाकळी ढोकेश्वर, निघोज, भाळवणी, आळकुटी या प्रमुख गटातील व्यवसायिकांना फटका बसला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अनेक महाविद्यालय, माध्यमिक प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत शिक्षकांनी आपल्याकडील जमीन, सोने घाण ठेवून श्रीमंत बाजार मध्ये गुंतवणूक केली. अनेक माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांनी बँकेतून कर्ज प्रकरणे मंजूर करून गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांना परतावा मिळत नसल्याने ते कर्जबाजारी झाले असून, आत्महत्येच्या विचारात आहे. पारनेर तालुक्यातील त्या महाविद्यालयातील उपप्राचार्याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करून गुंतवणुकदारांचा पैसा परत मिळावा व संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास ठेवीदारांसह उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.