Shringonde News ः श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरणातील येत्या १२ मार्चपासून रोटेशनने पाणी सोडण्यात येणार आहे. खासदार डॉ.सुजय विखे यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार बबनराव पाचपुते आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय झाला.
विसापूर धरणातून आवर्तन सोडण्याबाबत लाभधारकांनी वेळोवेळी केलेल्या मागणीमुळे धरणातून २०० दक्षलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार विखे आणि आमदार पाचपुते यांनी दिलेल्या सूचनेनूसार निर्णय घेण्यात आला. उन्हाची तीव्रता वाढत आहे. नगर दक्षिणेला दुष्काळाची झळ तीव्रतेने बसते. शेतकर्यांची शेतपिके तीव्र उन्हाळामुळे मान टाकू लागले आहेत. यातून विसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत होती. परंतु यावर निर्णय होण्यास विलंब होत होता. खासदार विखे यांनी यासाठी पुढाकार घेत, प्रशासन पातळीवर कार्यवाहीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे पाठपुरावा केला. याला यश आले.
विसापूर धरणातून पाणी येणार असल्याने या भागातील शेतीचा पाणी प्रश्नही मिटण्यास मदत होणार आहे. तसेच विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी, शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावातील २ हजार १०० हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले.