Voice Record :काळ्या बाजारात विक्री केला जाणारा तांदूळ प्रकरणी अहमदनगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी पोलिस अंमलदाराने दुकानदाराकडे 50 हजार रूपये लाचेची मागणी केली. दरम्यान सदरची लाच मागणी पडताळणी पंचासमक्ष सुरू असताना तो अंमलदार डिजिटल व्हाइस रेकॉर्डर घेऊन पसार झाला आहे. एकनाथ पंडित निपसे (वय 42) असे अंमलदाराचे नाव आहे.
नगर तालुक्यातील देहरे गावातील तक्रारदारांच्या फिर्यादीवरून अंमलदार निपसे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर येथील पथकाने ही कारवाई केली. देहरे येथील तक्रारदार यांचे गावात किराणा दुकान आहे. ते किराणा सामान व धान्य विक्री करतात, तसेच गावातील काही लोक मुलांना शाळेत मिळालेला तांदूळ त्यांचे दुकानात आणून विकतात. असा विकत घेतलेला तांदूळ ते अहमदनगर मार्केटयार्डमधील एका व्यापार्याला विकतात. मागील तीन-चार महिन्यांपूर्वी सदर मार्केटयार्ड येथील व्यापार्याच्या दुकानावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला हाेता. त्याच्याकडे काळ्या बाजारातील तांदुळ मिळल्याने गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. अटके दरम्यान त्या व्यापार्याने तक्रारदार यांचेकडून तांदूळ विकत घेतल्याचे सांगितलेवरून अंमलदार निपसे याने तक्रारदार व त्यांचे मुलास गुरूवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात बोलून घेतले. मुलाला या गुन्ह्यांमध्ये आरोपी न करण्यासाठी व अटक न करण्यासाठी 50 हजाराची मागणी केली. कोतवाली पोलिस ठाण्यात यासंदर्भात लाचलुचपतचे पथक पडताळणी करत सापळा लावला. यावेळी निपसे याने तक्रारदाराकडे 50 हजाराची मागणी केली. दरम्यान निपसेला तक्रारदार व पंचांबाबत संशय आल्याने, त्याने त्यांना एका खोलीत नेऊन दरवाजा बंद केला. त्यांची अंगझडती घेतली असता त्यास तक्रारदार यांचे कपड्यांचे आतमध्ये लपविण्यात आलेले डिजिटल व्हाइस रेकॉर्डर मिळाले. ते व्हाॅइस रेकॉर्डर निपसेने तक्रारदार यांचेकडून बळजबरीने हिसकावून घेऊन पोलिस ठाण्यातून पळ काढला. या प्रकरणी निपसे याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक शरद गोर्डे करीत आहेत.
