Nagar News ः नगर कॅटोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीत असलेल्या भिंगार शहराच्या घरपट्टी वाढीच्या किचकट प्रक्रियेवर कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी कायमचा मार्ग काढला आहे. दर तीन वर्षांनी सरसकट पाच टक्के दरवाढ वसंत राठोड यांनी सुचवली असून, त्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया नगर कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून सुरूवात झाली आहे.
भिंगार शहरातील नागरी भागाचे महापालिकेत हस्तांतरणाची प्रक्रिया खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कॅंटोन्मेंट आणि महापालिकेची सकारात्मकता आहे. संरक्षण विभागाचे दक्षिण विभाग मुख्यालयाकडून देखील कार्यवाही सुरू आहे. तसेच राज्याकडून केंद्राकडे प्रस्तावावरची कार्यवाही सुरू आहे. पुढील काही महिन्यांमध्ये यावर निर्णय अपेक्षित आहे.
वसंत राठोड
उपाध्यक्ष, नगर कॅंटोन्मेंट बोर्ड
कॅंटोन्मेंट बोर्डाकडून कर आकारण्याची पद्धत वेगळी आहे. शहरातील नागरिकांना बोलावून घेत तिथे चर्चेतून कार्यवाही व्हायची. मालमत्ता धारकाच्या क्षेत्रानुसार कर वाढ सुचवली जायची. यानंतर कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून लगेचच कार्यवाहीला सुरूवात व्हायची. यातून दोन्ही बाजूने चर्चेतून घरपट्टी वाढची रक्कम ठरवली जायची. ही किचकट आणि वेळखाऊपणाची प्रक्रिया होत होती. तसेच अवाजवी आणि अवास्तव कर वाढ व्हायची. यातून कमी क्षेत्र असलेल्या मालमत्ताधारकांना फटका बसायचा. मात्र यावर मार्ग काढण्यासाठी नगर कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष वसंत राठोड हे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते. खासदार डाॅ. सजुय विखे यांच्याशी देखील त्यांनी यावर चर्चा केली आणि एक प्रस्ताव ठेवला. खासदार विखे यांनी त्याला मान्यता दिल्यावर हा प्रस्ताव नगर कॅंटोन्मेंट बोर्डासमोर वसंत राठोड यांनी ठेवला.
घरपट्टी पाच टक्के वाढीचा हा प्रस्ताव होता. नगर कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने त्यावर सहमती दर्शवली. नगर कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे आणि अध्यक्ष बिग्रेडिअर रसेल डिसूजा यांनी या पाच टक्के वाढली मान्यता दिली. यानुसार नगर कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीत असलेल्या भिंगार शहरातील मालमत्ताधारकांकडून २०१९ आणि २०२२ ची घरपट्टी प्रत्येकी पाच टक्क्यांच्या वाढीने आकारली जाणार आहे.
तसेच पोलीस अधीक्षक चौकापासून भिंगारकडे येत असलेल्या पाॅटेंजर रस्ता, भिंगारनाल्यापासून नगर कॅंटोन्मेंट कार्यालयाकडे जाणारा ईराणी रस्ता आणि भिंगार शहरातील पंचशील वेश ते पंपिग स्टेशनपर्यंतचा रस्ता आणि त्याखालील पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. हे सर्व रस्ते आणि पाईपलाईन दुरुस्तीचे कामे एमईएस आणि लष्करी मुख्यालयाच्या अख्यारीत येतात. त्यामुळे खासदार विखे यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार केल्याची माहिती उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी दिली.