उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते तथा कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या अन्य नेत्याबाबत माेठे विधान केले आहे. ‘ज्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने भाजपशी काडीमाेड घेतला, तीच मागणी आम्ही केली हाेती. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या अन्य नेत्यांनी माैन बाळगले हाेते’, अशी खंत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाचे पहिला संकल्प मेळाव्यात शक्तिप्रदर्शन झाले. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी ही खंत व्यक्त केली. प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘अजित पवार गटाकडे 43 आमदारांचे बळ आहे. तसेच पक्षाची मान्यता आणि चिन्ह अबाधित राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनातील किंतू-परंतु दूर करून कामाला लागावे’. पक्षाला नेहमीच दुय्यम स्थान मिळत गेले. ते आता नकाे आहे, असेही कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “शिवसेनेचे 56 आणि आपले 54 आमदार हाेते. यानुसार अडीच नाही, तर किमान दाे वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद अपेक्षित हाेते. उद्धव ठाकरे यांच्याशी तशी चर्चा देखील करण्यासाठी गेलाे. त्यावेळी त्यांनी ताेंड उघडले नाही. या चर्चेला आदित्य ठाकरे व संजय राऊत देखील उपस्थित होते. मात्र काेणीही बाेलले नाही”. राष्ट्रवादीला अनेकवेळा संधी आली. मात्र दरवेळी माघार घ्यावी लागली. काॅंग्रेसला सुरूवातीपासून झुकते माप दिले. ठराविक जागा दिल्या. प्रत्येकवेळी आम्ही माघार घ्यायची का? पहिल्या क्रमांकावर यायचे नाही का? असे प्रश्न उपस्थित करून भाजपकडून पूर्ण न्याय मिळणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
‘राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर देखील प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले. पक्षाचे नाव, चिन्ह मिळेल की नाही, याची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये. आपल्यासाेबत 43 आमदार आहेत. आणखी येतील. अनेक कार्यकर्ते बराेबर येत आहेत. निवडणूक आयाेग याेग्य ताे निर्णय देईल. पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. इतरांना संधी दिली नाही व दुसरी फळी तयार केली नाही, ही शाेकांतिका आहे’, असेही पटेल म्हणाले.