अहमदनगरच्या नवे देडगाव (ता. नेवासे) इथल्या जिल्हा परिषद प्राथमिख शाळेचे शिक्षक अभिषेक अर्जुन घटमाळ आणि अरणगाव (ता. नगर) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या संगीता विजय कदम यांना राष्ट्र निर्माता पुरस्काराने गाैरविण्यात आले. शिक्षणाधिकारी अशाेक कडूस आणि शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते राटरी क्लबचा हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला.
अभिषेक घटमाळ यांच्या कलागुणांमध्ये विविधता
शिक्षक अभिषेक घटमाळ हे सर्वप्रथम कोकाटे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवेत असताना सुंदर चित्रकाम आणि लोकसहभागातून अनेक उपक्रम यशस्वी केले. गुणवत्ता व विविध कलेच्या माध्यमातून पटसंख्या वाढवली. त्यांना बालभारती पुणे इथं पाठ्यपुस्तक निर्मिती तसेच समीक्षण सेवेची संधी मिळाली. राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रशिक्षणात भाग घेण्याची संधी मिळाली. पुढे झिरपावस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुन्हा संपूर्ण शाळा स्वतः सुंदर पद्धतीने चित्रित केली. बासरीवादन, चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर, कविता, नाट्य, गायन, नृत्य अशा विविध कलेच्या मदतीने शाळेत अनेकानेक उपक्रम यशस्वी केले. नवे देडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही हस्ताक्षर, रांगोळी, चित्रकला, गायन, कविता, बासरीवादन अशा विविध कलेच्या कार्यशाळा घेवून वृक्षारोपणासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाल वाचनालय यशस्वीपणे सुरू केले. या आदी त्यांना विविध कला क्षेत्रात अनेक पारितोषिके व पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या आजवरच्या प्रामाणिक ज्ञानदानाच्या कार्याचा आढावा घेवून त्यांना यंदाचा राष्ट्र निर्माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेवासा तालुका गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, शिक्षण विस्ताराधिकारी धिंधळे, केंद्रप्रमुख सतीश भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश तांबे, डॅनियल दळवी, सहशिक्षिका मनिषा कांबळे यांनी काैतुक केले आहे.
संगीत कदम यांची शैक्षणिकबराेबर सामाजिक सेवा
शिक्षिका संगीता विजय कदम यांची आजवरची तीस वर्षाची शैक्षणिक सेवा झाली असून सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असताे. शैक्षणिक सेवेत त्यांनी विविध कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, शालेय प्रशिक्षण, केंद्र संमेलन आदी गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शाळेला दहा हजार रुपये किंमतीचे ग्रंथालय कपाट, अरणगाव येथील मानव सेवा केंद्रास दहा हजार रुपये रोख व एक पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक साहित्य मदत केली आहे. संगीत यांचे पती विजय हे बाई ईचरजबाई फिरोदिया प्रशालाचे मुख्याध्यापक, मुलगी मेडिकल कॉलेजला प्राध्यापक व मुलगा लॉ कॉलेजला प्राध्यापक, असे कुटुंब असून त्या एक आदर्श माता आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर गटशिक्षणाधिकारी जाधव, विस्ताराधिकारी साठे, केंद्रप्रमुख सोनवणे, मुख्याध्यापक लहाकर, केंद्रप्रमुख सोनावळे, शिक्षक कृपा कदम, ज्योती कदम, गिरीजा गारुडकर तसेच सरपंच स्वाती गहिले, मोहन तात्या गहिले, शिक्षणप्रेमी लहू आजबे, मोहन पुंड, प्रशांत गहिले, माऊली देशमुख यांनी काैतुक केले आहे.