MNS opposition to toll collection ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या संघटनेचे टोल नाक्याशी किती वाकडे आहे, हा संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे मनसे सैनिक नेहमीच टोल नाक्यावरून आक्रमक असतात. संगमनेरमधील पुणे-नाशिक हिवरगाव पावसा टोल नाक्यावर मनसेने आज खळखट्याक करत नाक्यावर स्थानिकांकडून वसुलीसाठी लावण्यात आलेले फलक फाडण्यात आले. मनसे सैनिकांनी केलेल्या याखळखट्याकमुळे नाक्यावर पळापळा होऊन गोंधळ उडाला.
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (एनएच ६०) संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाका आहे. हा टोल सुरू झाल्यापासून अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या टोलनाका प्रशासनाने स्थानिक वाहन धारकांकडून किमान ५० टक्के टोल आकारणीचा निर्णय घेतला. तसेच स्थानिकांना टोल क्राॅस करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीनुसार प्रति महिना ३३० रुपयांचा पास अनिवार्य केला आहे. तसे टोल प्रशासनाकडून टोल आकारणीबाबत फलक लावले गेले. याप्रकाराची माहिती मिळताच टोल नाका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत मनसे सैनिक एकत्र आले.
स्थानिक ग्रामस्थांसह संघटनांनी या टोल आकारणीला विरोध केला होता. परंतु मनसे सैनिक आज टोल नाक्यावर पोहोचले आणि नाक्यावर लावलेले वसुलीचे फलक थेट फाडण्यास सुरूवात केली. स्थानिकांकडून टोल वसूल केल्यास गाठ मनसेशी आहे, असा इशारा मनसे सैनिकांनी घोषणा देत केला. फलक फाडताना नाक्यावर पळापळ झाली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे सैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नाक्यावर लावलेले टोल वसुलीचे सर्वच फलक फाडत फेकून दिले.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाका अनेकदा वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत राहिला आहे. टोल प्रशासनाने रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष, बंद असलेले पथदिवे, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गावातील प्रवेशासाठी केलेले अर्धवट रस्ते, महामार्गाच्या निर्मीतीच्या वेळी तोडलेल्या झाडे आणि त्यावर होत नसलेल्या कारवाईमुळे हा टोल प्रशासन चर्चेत आहे. या टोलनाक्यावरून शेतकरी, नोकरदार आणि इतर नागरिकांना दररोज अनेकदा तालुक्याच्या ठिकाणी येतात आणि जातात. अनेकदा टोलनाका ओलांडावा लागतो. टोल प्रशासनाकडून अनेकदा स्थानिकांची अडवणूक होते. टोल भरण्यावरून वाद घातले जातात. टोल नाक्यावरील फास्टटॅग स्कॅनरमुळे स्थानिकांच्या बँक खात्यातून पैसे कट होत असल्याचा अनुभवही अनेकांना आला आहे.
मनसे सैनिकांची आज खळ्खट्याक स्टाईलने झालेला राड्यावरून तूर्तास टोल प्रशासनाने स्थानिकांकडून टोल आकारणार नसल्याचा दिलासा दिला आहे. यावर टोल प्रशासन कितपत ठाम राहते हे येणारा काळच सांगेल.