Namo Maharojgar Melawa ः उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करुन गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जिल्हा गुंतवणूक परिषद पार पडली. जिल्हा व राज्याच्या विकासाला चालना देण्याच्या हेतूने उद्योग संचालनालय (मुंबई) अंतर्गत नगर जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावतीने ही परिषद घेण्यात आली. यामध्ये विविध कंपनीतील उद्योजकांनी कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार केले.
जिल्हा गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उद्योग सहसंचालक सतिश शेळके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे आदी उपस्थित होते.
गुंतवतणूक परिषदेच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी सालीमठ यांनी गुंतवणूक परिषद आयोजनाबाबत शासनाचा उद्देश व त्याचा राज्याला होणारा फायदे याबाबतची शासनाची भूमिका विषद केली. सदर परिषदेच्या अनुषंगाने जिल्हयातील एकुण 648 उद्योग घटकांनी शासनासोबत सामंजस्य करार केले. सदर सामंजस्य करारान्वये जिल्हयामध्ये 5014 कोटी रुपये इतकी गुंतवणूक होणार असून, त्यामध्ये 23 हजार 231 इतके रोजगार उपलब्ध होणार आहे. सदर परिषद मध्ये झालेल्या सामंजस्य करारापैकी 5 उद्योगांना प्रातिनिधीक स्वरुपात सामंजस्य कराराचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्योगामध्ये मे. वरुण बेव्हरेजेस, एमआयडीसी, सुपा ता पारनेर (1017.00 कोटी), मे. जनशक्ती टेक्सटाइल मिल्स लि. (165.00 कोटी), इंडीया क्युओ फुडस प्रा.लि., एमआयडीसी सुपा ता पारनेर (90.50 कोटी), मे. गोल्ड ज्वेलरी कौन्सिल, अहमदनगर (50.00 कोटी), मे. महालक्ष्मी ग्रॅम लाईफ ओनियन प्रॉडक्टस (18.00 कोटी) यांचा समावेश आहे.
या परिषदेमुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्रात नविन उद्योगांची स्थापना होवून उद्योग क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. तर राज्यातील युवक युवतींना रोजगाराच्या मोठया प्रमाणात संधी उपलब्ध होतील अशी भावना पालकमंत्री विखे यांनी व्यक्त केली. नगर जिल्ह्यातील उत्पादनांच्या निर्यात वाढ होण्याकरीता उद्योजकांना मार्गदर्शन व सहाय्य करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर कार्यालयात जिल्हा निर्यातवृध्दी सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या सुविधा केंद्राचे उद्धाटन पालकमंत्री विखे यांनी व्हर्च्युल पध्दतीने करण्यात आले.