Letter to Prime Minister Narendra Mondi ः हलाखीचे जीवन जगणाऱ्या कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी नगर शहरातील कचरा वेचकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने रामवाडी येथे सर्व कचरा वेचकांनी एकत्र येवून सदरचे पत्र पाठविले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्या नेतृत्वाखाली कचरा वेचकांची न्याय, हक्काची मागणी करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास उडाणशिवे, संघटनेचे जेष्ठ सभासद इंदुबाई कांबळे, दुल्हनबाई गायकवाड, विमलबाई मंडलिक, लताबाई साबळे, लीलाबाई साबळे, विमलबाई चाखले, कालिंदा घाडगे आदी कचरा वेचक महिला व बांधव उपस्थित होते.
नगर शहरामध्ये पाचशे ते सहाशे कचरा वेचक रस्त्याने सुका कचरा गोळा करून आपला उदरनिर्वाह भागवतात. शहर स्वच्छ ठेवण्यात कचरा वेचक खूप मोठा सहभाग देत आहे. या कचरा वेचकांमुळे महापालिकेचा एकप्रकारे फायदाही होत आहे. असंघटीत कामगारांचे अनेक महामंडळ स्थापन झाली आहेत. त्याच धरतीवर कचरा वेचकांचे मंडळ स्थापन झाल्यास त्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचे कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भाऊसाहेब उडाणशिवे म्हणाले, “नगर शहरातील कचरा वेचक हलाखीच्या परिस्थितीमध्ये असुरक्षित जीवन जगत आहे. असंघटीत असलेले कचरा वेचकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे”. कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना झाल्यास त्यांचे आरोग्य, घराचे प्रश्न, सामाजिक सुरक्षा व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कल्याणकारी योजना राबविता येणार आहे. त्यामुळे समाजाच्या प्रवाहात कचरा वेचकांना आणण्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.