Religious News ः नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार कुठल्याही परिस्थितीत करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेले संत शेख महंमद महाराज मंदिर हे प्रति शिर्डी म्हणून जगभरात नावारूपास येईल, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला.
श्री संत शेख महंमद महाराज यांच्या ३२६ व्या संजीवन समाधी सोहळा व यात्रानिमित्त आयोजित श्री तुकाराम गाथा आणि योगसंग्राम ग्रंथ पारायण सोहळा सप्ताहाच्या सांगता झाली. संत शेख महंमद महाराजांचा यात्रा उत्सव बुधवार (ता. २०) होणार आहे. यात्रेसाठी नगर जिल्ह्यासह राज्यातील भाविक मोठी गर्दी करतात. यानिमित्ताने ११ मार्चपासून श्री तुकाराम गाथा आणि योगसंग्राम ग्रंथ पारायण सोहळा झाला. मागील आठ दिवसात या सप्ताहात भूषण महाराज महापुरुष, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, कबीर महाराज आत्तार, दीपक महाराज भोयटे, तुकाराम महाराज मुंडे, पुरुषोत्तम महाराज पाटील या कीर्तनकारांनी सेवा सादर केली. संजय महाराज धोंडगे यांनी काल्याचे कीर्तन रुपी सेवा सादर केली.
या वेळी यात्रा उत्साहात सहभागी झालेल्या नेतेमंडळीनी आपल्या शुभेच्छा देताना राजकीय नेत्यांनी शेख महमंद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, असा मुद्दा मांडला. जीर्णोद्धारासाठी दोन गटात सुरू असलेले कायदेशीर वादाबाबत दोन्ही गटाने सामंजस्याची भूमिका घेत दोन पाऊले मागे येऊन निर्णय घ्यावा, असे मत देखील यावेळी काही महिला नेत्यांनी बोलून दाखवले. माणिक महाराज मोरे, आमदार नीलेश लंके, धनश्री विखे, जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा, घनश्याम शेलार, प्रतिभा पाचपुते, डॉ. प्रणोती जगताप, सुनंदा पाचपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.