Ananda’s ration 55 lakhs scam ः पाथर्डीतील आनंदाचा शिधा घोटाळ्याचा प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी घोटाळ्याचे पैसे न भरता सामूहिक राजीनाम्याची भूमिका घेतली आहे. यामुळे पाथर्डी तहसिल कार्यालय प्रशासनाची कोंडी झाली आहे.
पाथर्डीच्या तहसिल पुरवठा विभागात आनंदाचा शिधा वितरणात ५५ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. या पुरवठा विभागात कार्यरत असलेला खासगी व्यक्ती काकासाहेब सानप याच्याकडे तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून स्वस्त धान्य दुकानदारांनी पैसे दिले होते. हे पैसे पुढे सरकारी बॅंक खात्यात भरलेच गेले नाहीत. कालांतराने या रकमेची तफावत असल्याचे उघडकीस आले. पाथर्डीतील स्वस्त धान्य दुकानदारांनी पैसेच भरलेच नाहीत, म्हणून तहसिलच्या पुरवठा विभागाकडून रक्कम भरण्यासाठी पाठपुरावा सुरू झाला. यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना आनंदाचा शिध्याच्या पैशाच्या वसुलीसाठी तहसिल प्रशासनाने कायदेशीर कारवाईच्या नोटिसा बजावल्या.
स्वस्त धान्य दुकानदारांनी या नोटिसांवर आक्षेप घेतला. आनंदाचा शिधाची रक्कम काकासाहेब सानप या व्यक्तीकडे दिल्याचे सांगितले. यासाठी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच संबंधित व्यक्तीकडे पैसे दिल्याचा दावा स्वस्त धान्य दुकानदारांनी केला. काकासाहेब सानप याच्याकडे पैसे पाठवल्याचे आॅनलाईन व्यवहार स्वस्त धान्य दुकानदारांनी दाखवत आक्रमक भूमिका घेतला. यातून पाथर्डी तहसिल पुरवठा विभाग आणि स्वस्त धान्य दुकानदार आमने-सामने आले आहेत.
दरम्यान, आनंदाचा शिधा घोटाळ्यातील रकमेच्या वसुलीसाठी पाथर्डी तहसिल पुरवठा विभागाने पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत पैसे पाठवलेल्या काकासाहेब सानप या तरुणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. तसेच पैसे दिले असल्याने पुन्हा पैसे न भरण्याचा भूमिका स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतली आहे. यावर देखील पाथर्डी तहसिल प्रशासनाकडून कारवाईच्या माध्यमातून दडपशाही केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा देखील निर्णय दुकानदारांनी या बैठकीत घेतला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाथर्डी प्रशासनाची कोंडी झाली आहे.
संघटनेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब ढाकणे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. तालुकाध्यक्ष शिवाजी मोहिते, विष्णुपंत ढाकणे, महादेव कुटे, दिलीप वांढेकर, सुरेश नागरे, महादेव दहिफळे, गोरक्ष दहिफळे, मेजर अर्जुन शिरसाठ, मेजर साहेबराव गीते यांच्यासह सुमारे ७५ स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.