Crime News ः महिलेचा विनयभंगप्रकरणी तलाठी संदीप नवनाथ नेहरकर याला राहुरी न्यायालयाने २१ महिने कारावास आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश ए. एस. वाडकर यांनी हा निकाल दिला आहे. सरकारी अभियोक्ता आर. के. गागरे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर येथे १९ आॅगस्टला हा प्रकार घडला होता. तलाठी संदीप नवनाथ नेहरकर याच्याविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली होती. पोलीस नाईक प्रवीण खंडागळे यांनी तपास करून गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. यानंतर गुन्ह्याचा खटला राहुरी येथील न्यायालयातील न्यायाधीश ए. एस. वाडकर यांच्या समोर चालला.
सरकारी अभियोक्ता आर. के. गागरे यांनी सरकारतर्फे कामकाज पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीवर तसेच सरकारी पक्षाच्या युक्तिवाद ग्राह्य धरत तलाठी नेहरकर याला दोषी धरण्यात आले. राहुरी पोलीस ठाण्याच्यावतीने पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई विनोद उंडे, भगवान थोरात यांनी काम पाहिले.
न्यायाधीश ए. एस. वाडकर यांनी या गुन्ह्यातील तलाठी असलेला आरोपी संदीप नवनाथ नेहरकर यास दोषी धरत एक वर्ष सहा महिने साधा कारावास व तीन हजार रुपए दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, तर शिवीगाळ केल्याप्रकरणी तीन महिने साधा कारावास तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा करावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम मुळ फिर्यादीस देण्याचा हुकूम न्यायालयाने केला आहे.