Onion Market News ः कर्जत तालुक्यातील आंबीजळगावचे कांदा व्यापारी शब्बीर शेख समाज माध्यमांवरील त्यांच्या व्यापाराविषयी केलेल्या चुकीच्या एका पोस्टमुळे हैराण झाले आहेत. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मला आणि माझ्या व्यापाराला बदनाम करण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. माझ्याविरोधात ज्यांनी हा प्रकार केला आहे. कट रचला आहे, त्यांच्याविरोधात न्यायालयात निश्चित उत्तर देईल, असे शब्बीर शेख यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
आम्ही जवळपास सहा वर्ष झाले, आमच्या शेतातील कांदा व्यापारी शब्बीर शेख यांना देत आलो आहे. आजतागायतपर्यंत आमच्या वजनात काडीमात्र फरक पडला नाही. किंवा व्यवहारात अडचण देखील आली नाही. कोणी ही अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. शेवटी शेतकरी असणारा माणूस शेतकऱ्यांला कधीच फसवणार नाही.
शेतकरी रमेश काळे,
फत्तेवडगाव, ता. कर्जत
शब्बीर शेख म्हणाले, “मी शेतकऱ्यांचा मुलगा असून शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्यांची परिस्थिती जवळून पाहत आहे. त्यांच्या शेतमालात काटा मारण्याचे पाप कधी ही करू शकत नाही. काही व्यावसायिक लोकांनी जाणून-बुजून माझी बदनामी व्हावी, नाव खराब व्हावे यासाठी कट-कारस्थान रचले. नांदगाव येथील शेतकऱ्यांनी देखील मला क्लिन चिट दिली आहे. पोलीस प्रशासनाने वजनकाटेची तपासणी करून योग्य शेरा दिला आहे. ज्यांनी आपल्या विरोधात कट रचला त्यांना न्यायालयात निश्चित उत्तर देईल”.
नांदगाव (ता.कर्जत) येथे मागील आठवड्यात आंबीजळगावचे कांदा व्यापारी शब्बीर शेख यांचे कामगार कांदा भरण्यासाठी गेले असता परिसरातील काही टारगट मुलांनी आणि व्यापारी दृष्टिकोनातून मला बदनाम करण्याच्या हेतूने माझ्या वजनकाट्यात दहा किलोची तफावत भरत असल्याचे समाज माध्यमांवर व्हायरल केले. वास्तविक दूध मोजण्याच्या वजनकाट्यात लिटरचे प्रमाण असल्याने ते १ किलोने कमी भरेल. मात्र १० किलोने कमी भरू शकते हे साफ चुकीचे आहे. यावेळी मी माझा वजनकाटा आणून सर्वासमोर प्रत्यक्ष तपासणी केली असता तंतोतंत वजन भरले. उपस्थित शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या हाताने वजनमापे करून पाहिले, असता तेच माप प्रत्यक्षात निदर्शनास आल्याचा दावा शब्बीर शेख यांनी केला.
वजनकाट्यात तफावत आहे सपशेल चुकीचे असून सर्व शेतकरी आणि कर्जत पोलीस प्रशासनाने देखील पाहिले आहे. आणि तसा अभिप्राय देखील दिला आहे. काही टारगट प्रवृत्तीची माणसे कांदा भरण्यास गाडी गेल्यावर कामगारांना दमबाजी करून वजन वाढविण्यास लावणे. वाहन चालकाला व्यापार करायचा असेल तर हफ्ता म्हणून रक्कम मागण्याचा प्रकार घडत होता. त्यास भाव न दिल्याने हा प्रकार घडला आहे. त्यांना आपण न्यायालयीन मार्गाने निश्चित उत्तर देऊ, असा इशारा शब्बीर शेख यांनी दिला.