Nagar Farmer News ः श्रीरामपूर तहसील कार्यालयामध्ये सुरू असलेल्या आकारी पडित संघर्ष समितीच्या उपोषणाचा आज सात दिवस झाले. या प्रकरणी तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. उपोषणकर्त्यांमधील तिघांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावलेल्या आंदोलनकर्त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्याची प्रशासनाकडून तयारी झाली. मात्र उपोषण करत असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच उपचार द्या. आम्ही येथून लेखी आश्वासन घेतल्याशिवाय हलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
आकारी पडित संघर्ष समितीच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. आंदोलनातील शेतकरी बाळासाहेब आसणे, ऍड. सर्जेराव घोडे आणि शालन झुरळे यांची आज प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ शेवंते यांनी सल्ला दिला आहे. तसे त्यांनी श्रीरामपूर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाला माहिती दिली आहे. मात्र उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. लेखी आश्वासनाशिवाय हलणार नसल्याची भूमिका घेतली. आमच्या जीविताचे काहीही होऊ द्या. आमच्या हक्काच्या जमिनी किमान आमच्या मुलाबाळांना तरी परत करा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली. आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा न निघाल्यास उद्या (ता. १८) प्रांताधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला. तसेच शेतकरी जेलभरो आंदोलन सुरू करतील, असे देखील सांगण्यात आले.
ब्रिटिश सरकारने १९८० साली ताब्यात घेतलेल्या तीस वर्षे कराराने जमिनी १९५० साली सोडणे गरजेचे होते. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतरही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेती हे शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असून ब्रिटिशांनी काढून घेतलेले साधन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही आपल्याच सरकारने जमिनी बेकायदेशीर ताब्यात ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशी सरकार कुठलीही जबाबदार घेण्यास तयार नाही. तसेच प्रशासन देखील असंवेदनशीलपणे वागत आहे. नगर जिल्हा शेतकरी संघटना व आकारी पडित संघर्ष समिती उद्या (ता. १८) या प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचा इशारा शेतकरी संघटना आणि संघर्ष समितीने दिला आहे.
उपोषणस्थळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे , श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, खेर्डीचे लोकनियुक्त माजी सरपंच प्रभाकर कांबळे यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला आहे.