Ahmednagar Police ः लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरू आहे. पोलिसांनी अवैध धंदे, विघातक कृतींबरोबर समाजकंटकांवर कारवाईची मोहिम उघडली आहे. वाहनांची तपासणी होत आहे. नाकाबंदी सुरू आहे. यातच जामखेड पोलिसांनी पुणे-जामखेड बसमध्ये बाॅम्ब असल्याचा फोन आल्याने चांगलीच धावपळ उडाली.
पुणे स्वारगेट-कर्जत-जामखेड ही जामखेड आगाराची बस जामखेडच्या दिशेने कर्जतहून दुपारी रवाना झाली होती. एका युवकाने बसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल जामखेड आगारास केला. या फोनमुळे आगारामधील अधिकारी यांची त्रेधा उडाली. आगार चालकाने ही माहिती बसचालक आणि वाहकास मोबाईलवर दिली. बसचालक आणि वाहकांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेले.
चालक उत्तम क्षीरसागर आणि वाहक विनायक गोरे यांनी कर्जत उपनगर परिसरात यासाठी बस थांबवली होती. कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती मुलूक आपल्या फौजफाट्यासह त्या ठिकाणी आले. त्यांनी संपूर्ण बसची पाहणी केली असता त्यामध्ये बॉम्ब अथवा बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. बसची वारंवार तपासणी केल्यानंतर पोलिसांना बसमध्ये बाॅम्ब नसल्याची खातरजमा झाली. यानंतर प्रवाशांना बसमध्ये बसवत रवाना केली.
दिशाभूल करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई ः पोलीस निरीक्षक मुलूक
कोणीही खोडसाळपणा करू नये. अशा खोडसाळपणामुळे विनाकारण नागरिकांना त्रास होतो. भविष्यात असे दिशाभूल करण्याचे प्रकार पुन्हा घडल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक मारुती मुलूक यांनी दिला. या घटनेतील युवकांस जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.