महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडाेबा गडाबाबत माेठी अपडेट समाेर आली आहे. खंडाेबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि घाेड्याचा गाभारा उद्या साेमवारपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. हा गाभारा दीड महिन्यासाठी बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दाेन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही.
गाभारा दुरुस्तीचे काम 5 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तरी देखील या काळात कुलधर्म, कुलाचार करण्यास अडचण येणार नाही. या काळात खंडाेबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र भाविकांना गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
खंडाेबाच्या मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू असताना गडावर येणाऱ्या भाविकांना अभिषेक, महापूजा पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार आहेत. जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतनासाठी राज्य सरकारतर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहेत. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या आणि उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे 107 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे.