Ahmednagar Police ः नगर अर्बन बँकेतअडकलेले आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने आधीच अस्वस्थ असलेल्या ठेवीदारांना शुक्रवारी पोलिसांनीही आणखी अस्वस्थ केले. बँक बुडवणार्या दोषींवर कारवाई करावी व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत म्हणून उपोषणास बसलेल्या ठेवीदारांनी उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून उपोषणस्थळी टाकलेला छोटा मंडप पोलिसांनी काढून नेला. परिणामी, रणरणत्या उन्हात ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय् आंदोलन केले. पोलिसांच्या या कृतीबद्दल निराशा व नाराजीही व्यक्त केली.
नगर अर्बन बँकेत 292 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे व फॉरेन्सिक ऑडीटनुसार सुमारे 105जण यासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतील 8 ते 10जणांना पोलिसांनी पकडले आहे व बाकीचे सापडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, ठेवीदारांचे समन्वयक डी. एम. कुलकर्णी, बँकेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा आदींच्या नेतृत्वाखाली दोषींवर कारवाईसाठी व बँकेत अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. यासाठी कुलकर्णी यांनी मागील 20 एप्रिलला पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन त्यांच्या कार्यालयासमोर 3 मे रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता.
गांधी, कुलकर्णी, चोपडा यांच्यासह अवधूत कुकडवाल, शरद आघाव, विलास कुलकर्णी, मीरा देहाडराय, तारा देहाडराय, सुमन जाधव, मीरा शिंदे, सविता भंडारी, बबई वाळके, आसाराम भागवत असे काही ठेवीदार पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर शुक्रवारी उपोषणास बसले होते. अनेक ठेवीदार वयोवृद्ध असल्याने त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून उपोषण स्थळी सावलीसाठी कापडी छोटा मंडप लावला होता. मात्र, पोलिसांनी येथे मंडप टाकून नेला. ठेवीदारांनी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या संपर्क केल्यावर, तुम्ही उपोषणास बसू शकता, पण मंडप टाकता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्यावर ठेवीदार निराश झाले. पण नंतर, आम्हाला उन्हात बसवा, पण ठेवीदारांना लुटणार्या नगर अर्बनच्या संचालक, अधिकारी व कर्जदारांवर कारवाई करा, अशी मागणी पोलिसांकडे केली व भर रणरणत्या उन्हात पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडला. सायंकाळपर्यंत हे उपोषण आंदोलन सुरू होते.
पोलिसांकडून अपेक्षा काय करणार
लाक्षणिक उपोषण आंदोलनाची माहिती पोलिसांना 15 दिवसांपूर्वी दिली होती. पण उपोषणाला परवानगी नाही व परवानगी घेतली नाही, असे पोलिसांनी सांगून उपोषणस्थळावरील छत काढून नेले, पण याबाबतची माहिती पोलिसांनी आधी सांगितली नाही व आक्षेपही घेतला नाही. मात्र, ठेवीदार आंदोलनास आल्यावर पोलिसांनी अचानक सावलीसाठीचा छोटा मंडप काढून नेल्याचे राजेंद्र गांधी यांनी सांगितले तर, अनेक मोर्चे व आंदोलने होतात, पण त्यावेळी अशी कारवाई का केली जात नाही, हे दुर्दैव आहे, अशी भावना ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा यांनी व्यक्त केली.
पोलिसांची या कलमाविषयी टाळाटाळ?
नगर अर्बन बँकेतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराबाबत पोलिसात दाखल फक्त एकाच गुन्ह्यात ठेवीदार हित संरक्षण कायद्यानुसार वाढीव कलम लावले गेले आहे. पण अन्य 8 ते 10 दाखल गुन्ह्यात पोलिसांकडून ठेवीदार हितसंरक्षण कायद्याचे कलम वाढवण्यात आलेले नाही. तसेच फरार आरोपींचा शोधही घेतला जात नसल्याने लाक्षणिक उपोषण केल्याचे सांगण्यात आले.