Nagar News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम जाही केला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होताच निवडणूक विषयक आदर्शआचार संहिता लागू झाली आहे. पुढे 6 जूनपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे. तरी निवडणूकी संबंधित सर्व यंत्रणेने आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पुर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरू सभागृहात बैठक घेण्यात आली या वेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य अधिकारी संभाजी लांगोरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, “सरकारी मालकीची कार्यालये, सरकारी वास्तू व त्यांच्या भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट, होर्डिंग्ज, झेंडे इत्यादी तात्काळ काढावीत. सार्वजनिक जागेवरील सर्व राजकीय जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, होर्डिग्ज, कटआऊट इत्यादी तात्काळ काढून घ्यावेत. तसेच बसस्थानक, बसथांबा, रेल्वे पुल, एसटी महामंडळाच्या बसेस व विद्युत व टेलिफोन खांब, यावरील जाहिराती काढून घेणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी”. मालमत्ता विद्रुपण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-1995 मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. शासकीय संकेतस्थळावरील, राजकीय व्यक्तींचे छायाचित्र तसेच नावे वगळण्याची कारवाई करावी तसेच बांधकाम व विकासासंदर्भातील माहिती संबंधित विभागाने तात्काळ जिल्हा निवडणूक शाखेकडे कळवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या.
आचारसंहिता काळात सर्व यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे तसेच निवडणूकीतील कामांची सर्व माहिती ठेवावी. लोकसभा निवडणूकीच्या कर्तव्यात कुढल्याही चुका होता कामा नये , असे स्पष्ट सांगत संभाव्य टंचाई परिस्थतीमध्ये टंचाई निवारणाची कामे फक्त शासकीय यंत्रणेमार्फत होणे अपेक्षित आहे. आचार संहिता काळात चुकीची माहिती पसरविण्यात आली तर त्याबाबत सत्यता तात्काळ तपासून त्याचा अहवाल सादर करावा. मतदार याद्यांमध्ये काही त्रृटी राहिल्यास त्या तात्काळ दूर कराव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आचार संहिता काळात जिल्हयातील सर्व पोलीस अधिका-यांनी तत्पर राहून काम करावे, असे सांगितले. यावेळी आदर्श आचारसंहिता व तिची अंमलबजावणी, संदर्भातील सर्व बाबींच्या माहितीचे सादरीकरण, उपजिल्हाधिकारी शाहू मोरे यांनी केले. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी सिव्हीजील ॲप व ॲप्लीकेशनबाबत माहिती दिली. या बैठकीस निवडणूक कामकाज संदर्भातील सर्व नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी व गटविकास अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.