Ahmednagar Irrigation Sub Division News ः बिल मंजूर करण्यासाठी बिलावर 18 टक्के लाच घेतल्याप्रकरणी दोन महिला अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने कारवाई केली आहे. कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंत्यावर ६२ हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झाली आहे.
पाटबंधारे संशोधन व जल निःसारन उपविभागाच्या सहायक अभियंता रुबिया मोहम्मद हनीफ शेख (वय 35, रा. प्लाॅट नंबर 365, रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, नगर) आणि पाटबंधारे संशोधन विभागाच्या कार्यकारी अभियंता रजनी पाटील (रा. 603, हरी आमंत्रण, कबरा सरीच्या समोर, दत्त मंदिर रोड, नाशिक) या दोघींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागामार्फत तक्रारदाराने उंबरे (ता. राहुरी) येथे चारीचे काम केले होते. या कामाचे बिल 7 लाख 75 हजार 963 रुपये झाले होते. या बिल मंजुरी करण्यापोटी शेख हिने स्वतःसाठी आठ टक्के आणि पाटील हिच्यासाठी दहा टक्के अशी एकूण 18 टक्के प्रमाणे 1 लाख 39 हजार 500 रुपयांची लाचेची मागणी केली होती. यावर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाकडे तक्रार केली. या लाचेच्या तक्रारीची पथकाने पडताळणी केली. यात तथ्य आढळले.
यानंतर रुबिया शेख हिने 18 टक्क्यांचा पहिला हप्ता म्हणून 62 हजार रुपये स्वीकारले. ही रक्कम स्वीकारताच लाचलुचपतच्या नगर पथकाने रुबिना शेख हिला ताब्यात घेतले. रुबिया शेख हिने पथकाने केलेल्या चौकशीत रजनी पाटील हिने देखील लाचेची रक्कम मागितल्याचा दुजोरा दिला. त्यामुळे शेख हिच्यासह पाटील हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी ही कारवाई केली. पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, किशोर लाड, महिला अंमलदार राधा खेमनर, सना सय्यद, पोलीस अंमलदार हरून शेख कारवाईत सहभागी झाले होते.