Lok Sabha Elections ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. नगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नगर जिल्ह्यातील हाॅटेलमधून विनापरवाना बेकायदा दारू विक्रीविरोधात 30 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान मोहिम राबवली.
या मोहिमेदरम्यान बेकायदेशीर दारू विक्रीत 95 गुन्हे नोंदवित 100 जणांना अटक करण्यात आली. कारवाईत 11 लाख 37 हजार 961 रुपयांचा देशी, विदेशी, गावठी दारू आणि चारचाकी गाडी, अस मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचो पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.
नगर शहरातील तोफखाना एक, पारनेर तालुका आणि श्रीरामपूर शहर प्रत्येकी सहा, पाथर्डी आठ, राहुरी, सोनई आणि नेवासा प्रत्येकी चार, शेवगावमध्ये 13, घारगांव तीन, लोणी, कोतवाली, मिरजगाव, शिर्डी प्रत्येकी दाेन, नगर तालुक्यात 11, आश्वी पाच, जामखेड आठ, कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा ठिकाणी अवैध दारू अड्ड्यांवर छापे पोलिसांनी घातले. यात 100 जणांना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांनी दिली.