Bhingar Breaking News ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा अहमदनगर कॅटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांच्या वाहनाची तोडफोड झाली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वसंत राठोड यांचे पुत्र सुमित यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीत राठोड यांच्या वाहनाची तोडफोड ही जाणिवपूर्वक करण्यात आल्याचे दिसते. परंतु यामागे कोण आहे, याची उलगडा लवकरच करू, असेही भिंगार कॅम्प पोलिसांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी ः वसंत राठोड यांचे घर नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील राधानगरी वसाहतीत घर आहे. राठोड यांची त्यांचे वाहन घरासमोर लावले होते. पहाटे साडेचार वाजता दुचाकीवरून आलेल्या सात जणांनी त्यांच्या वाहनाची सुरूवातीला पाहणी केली. यानंतर त्यांनी वाहन राठोड यांचेच आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहनाची तोडफोड केली. दगडांचा मार करून वाहनाच्या चारही बाजूच्या काचा फोडल्या. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. यानंतर वसंत राठोड यांनी सकाळीच पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. यात तीन दुचाकींवरून सात जण आल्याचे दिसते आहे. या सीसीटीव्हीचे तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
वसंत राठोड भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. भिंगार आणि परिसरात त्यांचे दांडगा जनसंपर्क आहे. भाजप सरकारच्या प्रत्येक योजना त्यांनी परिसरात राबवल्या आहेत. त्यातून त्यांची लोकप्रियता वाढली आहे. सरकारी योजना यशस्वी राबवल्याने केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील त्याची दखल घेतात. हा प्रकार घडल्याबरोबर राठोड यांना स्थानिक नेत्यांसह राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधून विचारपूस केली. खासदार सुजय विखे यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना याप्रकाराची बारकारईने तपास करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, असा प्रकार पहिल्यादांच माझ्याबरोबर झाला आहे. माझे कोणाशी वैर नाही. भिंगारसह परिसरात आणि नगर शहरातील सर्वच राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी स्नेहाचे संबंध आहेत. नेमका हा प्रकार कोणी केला, असे थेट सांगता येणार नाही. लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. भाजप पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या कामासाठी सध्या मी सक्रिय प्रचारक म्हणून काम करत आहे. स्थानिक नागरिकांच्या गाठीभेटीवर भर आहे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिंगारमधील बौद्धविहारमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी काल मध्यरात्री सहभागी झालो होतो. तिथे रात्री साडेबारा वाजेपर्यंत होतो. त्यानंतर घरी आलो आणि पहाटे साडेचार वाजता हा प्रकार झाला. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झाल्याने विरोधकांकडून हा प्रकार केला की काय, असा संशय येतो, अशी प्रतिक्रिया वसंत राठोड यांनी दिली. पोलीस अधीक्षक राकोश ओला यांना उद्या भेटून याबाबत सविस्तर निवेदन देत कारवाईची मागणी करणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले.