Jamkhed News : चार दिवसांपासून रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीनी डॉ. भास्कर मोरे याच्यावर कारवाई व्हावी, यासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण सुरू केले. याच अनुषंगाने आखेर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिंनीने मोठ्या हिमतीने दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित विद्यार्थींनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, ‘डॉ. भास्कर मोरे याने पीडित मुलीस कॉलेजच्या प्राचार्य कार्यालयामध्ये बोलवून घेतले. तसेच कार्यालयाच्या ॲंटी चेंबरमध्ये तिच्याशी अश्लील चाळे केले’. दरम्यान, रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षाने काॅलेजमधील विद्यार्थिंनीबरोबर केलेल्या या घटनेमुळे शैक्षणिक आणि जामखेडमधील विविध संघटनामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वर्षा जाधव या तपास करीत आहेत.
यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा
रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूरचे संस्थापक अध्यक्ष याच्याविरोधात गेल्या वर्षी देखील कॉलेजमधील मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार दिवसांपासून रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्याविरोधात शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत हे देखील विद्यार्थींसमवेत उपोषणास बसले आहेत. उपोषण स्थळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रिपब्लिकन पक्ष जामखेड तालुका वकील संघ यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला आहे.
बेमुदत उपोषण आंदोलन सुरूच
प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेत मुलींच्या तक्रारीसाठी महिला सहायक निरीक्षक अधिकारी यांची नियुक्ती केली होती. मात्र तरी देखील विद्यार्थी डॉ. भास्कर मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यावर ठाम होते. अखेर रात्री उशिरा डॉ. भास्कर मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र जो पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील कुलगुरू उपोषणस्थळी येत नाहीत, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील, असा ठाम निश्चय घेत विद्यार्थींनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.