Ahmednagar News ः अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात सकाळी सकाळीच सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला. भिस्तबाग रस्त्यावरील वृंदावन कॉलनीत दोन ठिकाणी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून चोरांनी दुचाकीवरून धूम ठोकली. दोन्ही घटनेत सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गीता मुकुंद देशमुख (वय 49 रा. श्रीनाथ कॉलनी, रासणेनगर, सावेडी) या सोमवारी (दि. 29) सकाळी आठच्या सुमारास वृंदावन कॉलनी येथून रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या समोरून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने गीता यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबडून धूम ठोकली. याप्रकरणी गीता यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी चोरांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
रंजना विलास जतकर (वय 65, रा. अशोकनगर, सावेडी) या सोमवारी सकाळी वृंदावन कॉलनी येथून दुचाकीवरून जात असताना त्यांच्या पाठीमागून विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या चोरांनी रंजना यांच्या गळ्यातील 14 ग्रॅमचे मंगळसूत्र ओरबडून धूम ठोकली. रंजना यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, एकाच वेळी दोन ठिकाणी सोनसाखळी चोरी झाल्याची घटना समजताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही ठिकाणी चोरी करणारा चोरटा एकच असल्याचा संशय असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.