भारतीय स्टेट बँकेच्या एमआयडीसी इथं असलेल्या क्षेत्रिय व्यवसाय कार्यालयाच्यावतीने पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थी पथ विक्रेत्यांना क्षेत्रिय महाप्रबंधक सूर्या पांडे यांच्या हस्ते क्युआर कोड देण्यात आला. यावेळी कर्ज विभागाचे मुख्य प्रबंधक आशिष डांगे, नागपूर शाखा व्यवस्थापक प्रशांत मैदकर, उपप्रबंधक धनाजी भागवत व पलाश ढोणे आदि उपस्थित होते.
क्षेत्रिय महाप्रबंधक सूर्या पांडे म्हणाले, “काेरोना महामारीच्या संकटामुळे अनेक छोट्या छोट्या व्यवसायाची स्थिती दयनीय झाली होती. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून हजारो सर्वसामान्य पथविक्रेते नागरिक या योजनेचा फायदा घेत आहेत. आता भारतीय स्टेट बँक डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेच्या लाभार्थींना स्वतःचा क्युआर कोड उपलब्ध करून दिला आहे”. सर्वसामान्यांना स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजना उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पथ विक्रेत्या नागरिकांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून सहभगी व्हावे, असे आवाहन केले.
पंतप्रधान स्वनिधी योजनेची माहिती देताना मुख्य प्रबंधक आशिष डांगे यांनी सर्वसामान्य पथ विक्रेत्यांना खेळते भांडवला अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पंतप्रधान स्वनिधी या योजनेच्या लाभार्थींना भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून विना तारण खेळते भांडवल एका वर्षासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. प्रामाणिकपणे वेळेत परतफेड करणाऱ्यांना 20 ते 50 हजर रुपयांपर्यंतचे कर्ज अत्यल्प व्याजदराने देत असल्याचे सांगितले.