Maratha Reservation ः मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या व सगेसोयरेचा कायदा करा, अशा मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शनिवारी भिंगार आणि नगर शहरात चार ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन झाले. या आंदोलनांमुळे महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती.
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गावा-गावात रस्ता रोको आंदोलनाचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत सकल मराठा समाजाच्या नगर शहरातील पदाधिकार्यांनी शनिवारी सकाळी नगर-मनमाड महामार्गावरील राजमाता जिजाऊ चौकात (डेअरी चौक, शेंडी बायपास), भिंगारला वेशीजवळ (विजय लाईन चौक), केडगाव वेशीजवळ व शेंडी येथे नगर-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महामार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी पाऊण वाजेपर्यंत दीड तास रस्ता रोको आंदोलन केले. शेंडी व एमआयडीसी आंदोलनाच्या ठिकाणी तहसीलदारांनी येऊन निवेदन स्वीकारले तर अन्य दोन ठिकाणी स्थानिक अधिकारी आले होते.
सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, आतापर्यंतच्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, कुणबी नोंदी शोधणार्या शिंदे समितीच्या कामाला मुदतवाढ द्यावी, हैदराबाद गॅझेट व नव्याने सापडलेले सातारा गॅझेट यामधून मराठा समाज हा कुणबी असल्याचे सिद्ध होत असल्याने हे दोन्ही गॅझेट स्वीकारावेत, अशा मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या.
उशीरा आंदोलन सुरू
सध्या बारावीची परीक्षा सुरू असल्याने सकाळी 11 वाजता पेपर सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांनी आंदोलने सुरू करण्यात आली. तसेच दुपारी 1 वाजता पेपर संपणार असल्याने त्याआधीच पाऊण वाजता आंदोलन थांबवण्यात आले. एमआयडीसीच्या आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देऊन तातडीने विखे पाटील रुग्णालयाकडे पाठवण्यात आले.
भिंगारमध्ये रास्ता रोको
मराठ्यांचा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्रातील करोडो मराठ्यांना सरकारने दिलेला सगेसोयरे हा अध्यादेश काढण्यासाठी 24 फेब्रुवारीला रस्ता रोको भिंगार येथील सकल मराठा समाजाच्यावतीने विजय लाईन चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरकारने अध्यादेश देऊन जी मराठा समाजाची फसवणुक करुन मुंबईमधून मराठ्यांना पाठीमागे पाठवल्याने, यामधून मराठा समाज पुन्हा एकदा रास्ता रोको करुन आपल्या भावना मराठा बांधवांकडून व्यक्त करण्यात आल्या आहे. यावेळी संपत बेरड, शामराव वाघस्कर, राजेश काळे,कैलास वाघस्कर,दीपक लिपाने,गणेश बेरड,अरुण चव्हाण,अंकुश शिंदे, नवनाथ मोरे,पंकज चव्हाण,नवनाथ कापसे,गणेश सातकर,मच्छिंद्र बेरड,रोहित बावारे,संजय सपकाळ,रमेश कडूस पाटील,सुरेश बेरड,कल्याण पवने,विलास तोडमलडॉ. रामदास केदार,ईश्वर गपाट, कैलास काटे, संतोष बोबडे, चेतन सपकाळ, सुरज बोबडे, नंदू कवडे, रमेश कराळे, गणेश वागस्कर, अमोल वागस्कर, अरुण तनपुरे, बाळासाहेब राठोड,विलास शिंदे,राजेंद्र कडूस,नितीन हापसे,सागर शंकर मिसाळ,गोरख चव्हाण,राजेंद्र घोगरे,श्रीकांत क्षीरसागर,योगेश साळुंखे,ईश्वर बेरड,संग्राम जगताप,संजय कापसे,रोहित चव्हाण,सचिन क्षिरसागर, सोमनाथ मोरे,अविष्कार बोठे,सुरज मिसाळ,अक्षय तोडमल,महेश वाघस्कर,गणेश शिंदे आदी मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता