124 व्या क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी अध्यक्षतेखाली झाली. खासदार अरविंद सावंत (मुंबई), खासदार धनंजय महाडिक (कोल्हापूर), खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी (सोलापूर), खासदार अजय दुबे (नई दिल्ली), सदस्य सुदर्शन डुंगरवाल (अहमदनगर) आदीसह महाराष्ट्रातील 39 सदस्य उपस्थित होते.
सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी चर्चेत विविध मुद्दे उपस्थित केले. अहमदनगर ते पुणे व्हाया दौंड शटल रेल्वे सुरु करण्यात यावी. तसेच अहमदनगर आणि राजस्थानमधील लोकांचे पारिवारिक संबंध असल्याने या दरम्यान दौंड-अहमदनगर-मनमाड-भुसावळ-खंडवा-भोपाळ-रतलाम-भीलवाला-अजमेर-जयपूर, अशी नवीन एक्स्प्रेस रेल्वे सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली.
शिर्डीला येणार्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दौंड-इंदौर रेल्वे अहमदनगरमधून सुरु करण्यात यावी. त्याचप्रमाणे साईनगर मुंबई-शिर्डी वंदे भारत रेल्वे दररोज सुरु करण्यात यावी. पत्रकारांसाठी देण्यात येणारी सवलत पुन्हा सुरु करण्यात यावी. तसेच कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी बंद झालेली सवलत पुन्हा सुरु करावी, आदी मागण्या समितीसमोर मांडल्या.
नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षात भाडे-व्यतिरीक्त (नॉन-फेअर) महसूल आणि तिकीट तपासणी महसूलाच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केल्याचे सांगितले. महाव्यवस्थापक नरेश ललवानी यांनी सदर मागण्यांबाबत विचार विनिमय करुन सदस्यांच्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.