Ahmednagar Politics ः आमदार नीलेश लंके यांनी आज पुणे येथील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात येत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि आमदार नीलेश लंके यांची संयुक्त झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही बाजूने प्रवेशाची आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची स्पष्टता झाली नाही. त्यामुळे आमदार लंकेची विचारधारा स्पष्ट झाली असली, तरी भूमिकेविषयी गोंधळ कायम राहिला. शरद पवार आणि नीलेश लंके या दोघांनी मिळून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह विरोधकांना पुन्हा एकदा बुचकळ्यात टाकले आहे.
आमदार लंके मुंबईत की दिल्लीत दिसणार? शरद पवार म्हणाले…
आमदार नीलेश लंके यांना सुरूवातीला बोलून दिल्यानंतर शरद पवार म्हणाले, पारनेरमध्ये लढण्यासाठी आणखी काही सहकारी होते. पारनेरची माहिती, यानंतर नीलेश लंकेंना उमेदवारी दिली. हा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. पारनेर दुष्काळी भाग. एमआयडीसी आणली. दुधाच्या व्यवसायाची काळजी घेतली. येथे लंकेंनी प्रामाणिकपणे कामे केली. अत्यंत कष्ट करणारी व्यक्ती म्हणून लंकेंकडे आता पाहिले जात आहे. मध्यंतरी काही निर्णय झाले असतील आणि नसतील. परंतु बांधिलकी प्रामाणिक होती. ज्यांची बांधिलकीत प्रमाणिकपणा असतो, त्यांना आमची साथ कायम असते. विरोधी पक्षात देखील असतात. त्यांना देखील साथ देतो. आज त्यांचे स्वागत करतो. दुष्काळाचे संकट आहे. पारनेरमधील भागात चिकाटीने काम करत त्यांच्याकडून लोकसेवा घडो, अशी अपेक्षा करतो. लोकांच्या सेवेसाठी आम्ही लंकेना गरज पडल्यास मदत करत राहणार आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले. आमदार लंके भविष्यात जयंत पाटील यांच्याबरोबर मुंबईत दिसतील की, दिल्लीत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्याबरोबर दिल्लीत दिसतील. यावर शरद पवार म्हणाले, “ते पारनेरमध्ये दिसतील. सध्या दुष्काळ पडला आहे आणि मुंबईत काय काम आहे”, असे हजरजबाबीपणाने उत्तर दिले.
शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी नीलेश लंके हे शरद पवार यांच्याच बाजूला बसले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार दादा कळमकर, खासदार अमोल कोल्हे, आमदार प्राजक्त तनपुरे, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रतापराव ढाकणे, माजी आमदार राहुल जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. आमदार नीलेश लंके यांनी ‘मी अनुभवलेला कोव्हीड’ या पुस्तकाच्या प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यासाठी आमदार लंके हे त्यांच्या पारनेर येथील निवासस्थानातून ‘तुतारी’ वाजवतच बाहेर पडले होते. पुणे येथील राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यालयाजवळ पोहोचल्यावर तिथे देखील आमदार लंके यांचे कार्यालयात ‘तुतारी’ वाजतच प्रवेश झाला. त्यामुळे आमदार लंकेच्या प्रवेश आणि लोकसभेची उमेदवारी निश्चित, अशी अटकळ असतानाच पवार आणि लंके यांनी समोरासमोर येऊन देखील भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे पवार आणि लंके या दोघांनी मिळून आता विरोधकांना अधिकच बुचकळ्यात टाकले आहे. यावर पडदा कधी पडणार याचीच चर्चा राज्यात रंगली आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी पवार आणि लंके यांच्यात अर्धातास बंद खोली चर्चा झाली. ही चर्चाच राजकीय टर्निंग पाॅईंट असल्याचे सांगितले जात आहे.
हृदयाबरोबर कार्यालयातही साहेबांचा फोटो
आमदार लंके म्हणाले, “सगळेच विचार होते, पवार साहेबांकडे प्रवेश करणार का? परंतु मी आजही पवार साहेबांच्या विचारधारेबरोबरच आहे. मी विधानसभेची २०१९ निवडणूक लढलो, तेव्हा दसर्याच्या दिवशी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ पवार साहेबांनीच केला होता. लहानपणापासून पवारसाहेबांचा अभ्यास करणारा कार्यकर्ता आहे. कोविड काळात एकमेकांना विसरलो होते. त्याचवेळी शरद पवार साहेबांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले. हे काम करताना पवार साहेबांची अदृश्य ताकद मिळत राहिली. कोविड काळात केलेल्या कामात ज्या घटना अनुभवल्या, त्या सर्व मी अनुभवलेला केव्हीड या पुस्तकात लिहिल्या आहेत. या पुस्तकाचे प्रकाश देखील पवार साहेबांच्याच हस्ते झाले पाहिजे, ही भूमिका ठेवून येथे पवार साहेबांना भेटायला आलो आहे”. पवार साहेबांची विचारधार आणि पक्ष एकच आहे. माझ्या सर्व पोस्ट, कार्यालयातही आजही शरद पवार साहेबांचा फोटो आहे. ते आमच्या हृदयात आहेत. त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही, असेही आमदार लंके यांनी म्हटले.
काल, आज आणि उद्याही साहेबांच्या विचारधारेबरोबर
यानंतर लंके आणि पत्रकारांमध्ये प्रश्नांची जुगलबंदी झाली. अजित पवार यांनी, असे म्हटले होते की, खासदारकीच्या मोहापोटी तुम्ही पवार साहेबांकडे जात आहात. यावर लंके यांनी खासदारकी आणि निवडणुकीविषयी पवार साहेबांबरोबर एका शब्दाने चर्चा नाही. मी पुस्तक प्रकाशनाला आलो आहे. पवार साहेबांच्या शेजारी बसलो आहे. साहेबांची विचारधारा माझ्याबरोबर काल, आज आणि उद्या देखील असणार आहे, असे सांगितले. पक्ष सोडल्या आमदारकी जाईल. कारवाई होईल, असे अजितदादांनी म्हटले आहे. यावर हे मी काही एेकलेले नाही. प्रत्यक्ष चर्चाच नाही. त्यामुळे त्यावर मी काहीच बोलमार नाही. तसेच एवढे मोठे नेते येथे असताना खासदारकीवर देखील मी न बोलेले बरे होणार नाही, असे लंके यांनी स्पष्ट केले. खासदार अमोल कोल्हे यांनी तुम्हाला गळ घातल्याचे बोलले जातेय, यावर आमदार लंके यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ महाराज हे नाटक नियोजित होते. खासदार अमोल कोल्हे हे माझे भाऊ आहेत. त्यांच्याकडे आग्रह धरला होता आणि यातून त्यांनी लगेच महानाट्याची तारीख दिली. राजकीय गोष्टींवर त्यांच्याशी देखील भाष्य झालेले नाही, असे सांगितले.
साहेब सांगतील तो आदेश!
तुमच्याबरोबर आज अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाहीत. यावर लंके यांनी आम्ही सर्व एकच आहोत. यावर लंकेंच्या हातात तुतारी की घड्याळ आहे, हे स्पष्ट करा. येथे सर्वेसर्वा म्हणून साहेब, बसले आहेत. त्यामुळे साहेब सांगतील तो आदेश. साहेबांच्या मंचावर लंके दिसतील की, यावर लंके यांनी साहेबांच्या मंचाहून दुसरीकडे जाणे एवढे सोपे आहे का?, अशी प्रश्नोत्तरांची जुगलबंदी रंगली होती.