‘आदिपुरूष’ आणि त्याचा दिग्दर्शक ओम राऊत याच्याभाेवती अडचणी अधिक वाढू लागल्या आहेत. हा चित्रपटा १६ जूनला रिलीज झाला. त्यातील संवाद, व्हिएफएक्स, प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनाॅन यांच्या लूक आणि अभियनामुळे वादग्रस्त बनला. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया सिने वर्कर्स असाेसिएशनने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र लिहून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली हाेती. यानंतर आता ‘आदिपुरूष’ चित्रपटाचे निर्माते भूषणकुमार, दिग्दर्शक आेम राऊत आणि लेखक मनाेज मुंतशीर यांच्याविराेधात गुन्हा नाेंदविण्याची मागणी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी गृहमंत्री अमित शाह यांना हे पत्र लिहिले आहे. “‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांनी संपूर्ण रामायणाची प्रतिमा खराब केली आहे. कराेडाे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविराेधात कारवाई झाली पाहिजे”, असे पत्रात म्हटले आहे.
भारतातील चित्रपटगृहांमध्ये 16 जूनला प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहिले आहे, असे सुरूवात ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी केली आहे. “या चित्रपटामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्या प्रतिमेला मलिन करणारे आहेत. टी-सीरिज, चित्रपटाचे निर्माते, लेखक मनोज मुंतशीर आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटात दाखवलेली कलाकारांची वेशभूषा, देवाची चुकीची प्रतिमा दर्शवणारी दृश्ये, संवाद यामुळे संपूर्ण हिंदू आणि सनातन धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे”, असे पत्रात म्हटले आहे.
“‘आदिपुरूष’ चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार टी-सिरीज आणि इतर, दिग्दर्शक ओम राऊत, लेखक मनाेज मुंतशीर यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्याचा विनंती करत आहाेत”, असेही पत्रात शेवटी म्हटले आहे. ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रदर्शित झालेल्या 16 जूनपासून तीन दिवस चांगली कमाई केली हाेती. त्यानंतर मात्र चिपत्रट गृहातील खेळ रिकामे राहू लागले आहेत.