एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याभाेवती सीबीआयने चाैकशीचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. वानखेडे यांच्या दाेघा नातेवाईकांची सीबीआय चाैकशी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात त्यांचे वडील आणि बहिणीची चाैकशी हाेणार आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात, एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर एनसीबीच्या दक्षता समितीने ठपका ठेवला आहे. आर्यनला साेडविण्यासाठी 25 काेटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि त्यातील 50 लाख रुपये घेतल्याचा आराेप समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या पथकावर आहे.
दक्षता समितीच्या अहवालानुसार सीबीआयने समीर, एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंग, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यासह साक्षीदार के. पी. गाेसावी आणि सॅनविल डिसाेझा या दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सीबीआय मार्फत सुरू आहे.
या गुन्ह्यात समीर वानखेडे यांच्यानंतर आता सीबीआय पथक उद्या वानखेडे यांची बहीण आणि वडिलांचीही चाैकशी करणार आहेत. समीर वानखेडे यांची सीबीआयने यापूर्वी आठ ते दहा वेळा चाैकशी केली आहे. त्यानंतर वानखेडे यांनी सीबीआयविराेधात याचिका दाखल केली. न्यायालयाने वानखेडे यांना चाैकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देत 8 जूनपर्यंत अंतरिम संरक्षण दिले आहे.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव आणि त्यांची बहीण यांची उद्या मंगळवारी दहा वाजता सीबीआय कार्यालयात चाैकशीसाठी हजर जाणार आहे. समीर वानखेडे यांची ज्या पथकाने चाैकशी केली, तेच पथक वानखेडे यांची बहीण आणि वडिलांची चाैकशी करणार आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांनी पाेलिस आयुक्तांना पत्र लिहून आपल्या जीवाला धाेका असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी पाेलिस संरक्षण मिळावे, असे देखील पत्रात म्हटले आहे.