रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे (आठवले गट) यवतमाळ इथं प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सहभागी झाले हाेते. या शिबिरात आठवले यांनी यावेळी चांद्रयान-3 माेहिमेवर केलेली कविता चर्चेत आली आहे.
भारत देशाचे सर्व सायंटीस्ट आहे आमची जान
म्हणूनच पाठविले चांद्रयान
आम्हाला आहे सर्व गोष्टींचे भान
म्हणूनच नरेंद्र मोदींनी पाठविले चंद्रावर यान
रामदास आठवले यांनी चांद्रयान-3 माेहिमेवर केलेली ही कविता सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. याचवेळी शिबिरात त्यांनी पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘इंडिया’ आघाडीवर टीका केली. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष (आठवले गट) पुढच्या लाेकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महायुतीसाेबत लढणार असून, त्यासाठी भाजपचे नव्हे, तर रिपाइ पक्षाच्याच चिन्हावर लढवणार असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले म्हणाले, “देशात 2024 मध्ये हाेत असलेल्या निवडणुकीत पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या विराेधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ हे नाव देऊन चूक केली आहे. यातच ‘इंडिया’तील प्रत्येकाला पंतप्रधानपदाचे डाेहाळे लागले आहेत”. महायुतीत रिपाई (आठवले गट) निवडणूक लढविताना सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत, असेही रामदास आठवले म्हणाले.
‘पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचाच 2024 मध्ये विजय हाेणार आहे. कारण जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. माेदी यांच्या सरकारमध्ये लहान पक्षांना मंत्रीपदे देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप लहान पक्षांना संपवित असल्याचा आराेप चुकीचा आहे’, असेही रामदास आठवले म्हणाले. उद्धव ठाकरे आमच्याकडे आल्यास त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊ. शिवसेनेला भाजपने फाेडले नाही, तर उद्धव ठाकरे हे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीबराेबर गेल्याने त्यांच्या वैचारिक परंपरेला छेद दिल्याने पक्षफुटीची नामुष्की आल्याचेही रामदास आठवले म्हणाले.