सामाजिक न्यायाचा उद्गाता असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त साहित्यिक तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी शंभर व्याख्याने देऊन त्यांना जयंतीची आगळी-वेगळी मानवंदना दिली. 6 मे रोजी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीपासून या व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली होती. तर त्यांच्या जयंती पर्यंत ही व्याख्याने विविध शाळा, महाविद्यालय व संस्थेमध्ये सुरु होती.
कॉ. गोविंद पानसरे यांनी शाहू महाराजांवर शंभर व्याख्याने देण्याचे ठरवले होते. मात्र त्यांची हत्या झाल्याने हे व्याखानाचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. त्यांच्या प्रेरणेने व राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष साजरे होत असताना त्यांच्या विचाराने समाजात समता, न्याय व बंधुताची मूल्य रुजविण्यासाठी ही व्याख्याने देण्यात आल्याची माहिती पांडुळे यांनी दिली.
साईनाथ विद्यालय आळकुटी (ता. पारनेर) येथे शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शंभरावे व्याख्यान पार पडले. स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा माजी सरपंच बाबाशेठ भंडारीया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य मंगेश जाधव, रयत सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर शाहू महाराजांचा मोठा प्रभाव होता. शाहू महाराजांनी समाज उपयोगी धोरणे व कायदे अमलात आनले. नोकरीत आरक्षण, महिलांसाठी संरक्षणाचे कायदे, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण्याची कायदे, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यावर बंदी इत्यादी कायदे आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत झाले आहे. शेतकर्यांसाठी त्याकाळी रोजगार हमी धोरण, जलसंधारणाची कामे, राधानगरी सारख्या भारतातील त्याकाळी सर्वात मोठे धरण, औद्योगिक वसाहती, सहकारी तत्त्वावर संस्थांची स्थापना, आंतरजातीय विवाहला चालना, सक्तीचे व मोफत शिक्षण, सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंगची स्थापना केली”.
‘बहुजन समाजाला शिक्षित केले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रोत्साहन व मदत केली. देशाचे ऐक्य टिकवण्यासाठी जाती व्यवस्थेला मोडीत काढण्याचे प्रयत्न केले. कुस्ती, नाट्य क्षेत्र, साहित्य इत्यादी कलागुणांना वाव दिला. त्यामुळेच त्यांना लोकराजा राजर्षी यासारख्या पदव्या मिळाल्या. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी या देशाला दिशादर्शक कार्यक्रम आपल्या कृतीतून दिला. अशा राजाचे आदर्श पुढील पिढीने घेण्याचे त्यांनी आवाहन केले’.
अहमदनगर शहरातील केडगाव देवी अंबिका विद्यालय, बीड जिल्ह्यातील पिंपरी घुमरी, कर्जत, पारनेर तालुक्यातील भाळवणी, सुपा, जवळा, वडझिरे आदी विविध ठिकाणी पांडुळे यांनी शाहू महाराजांवर व्याख्याने दिली.