राज्यात पाऊस नसल्याने विपरीत परिणाम हाेण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे गाळप कमी हाेणार आहे. याचा परिणाम म्हणून साखर उत्पादन घटणार आहे. साखर उत्पादन बारा लाख टनांनी घटनाचा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे.
राज्याची प्रतिदिन गाळप क्षमता आठ लाख 82 हजार 550 टन एवढी आहे. त्यानुसार गेल्या हंगामात राज्यातील 22 जिल्ह्यांतील कारखान्यांकडून 1 हजार 52 लाख टन उसाचे गाळ झाले हाेते. यंदा 14 लाख 37 हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. मात्र, ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऊस उत्पादनात आघाडीवर असलेल्या काेल्हापूर, सांगली, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. परिणामी यंदा प्रत्यक्षात 970 लाख टनांइतके ऊस गाळप हाेण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 83 लाख 91 हजार टनांनी गाळप कमी हाेण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
इथेनाॅल निर्मितीकडे 15 लाख टन साखर वळवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 94 लाख टन साखरेचे उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी 105 लाख 31 हजार टन सारखेचे उत्पादन झाले हाेते. त्या तुलनेत यंदा सुमारे 12 लाख टनांनी साखरेचे उत्पादन कमी हाेईल, असे साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
राज्यात सथ्या 14 लाख 37 हजार हेक्टर ऊस लागवड केलेले क्षेत्र आहे. त्यातून 1 हजार 78 लाख टन ऊस उत्पादनाचा अंदाज आहे. यातून 970 लाख टन ऊस गाळप हाेण्याचा अंदाज आहे. साखर उत्पादन 109 लाख टनाचा अंदाज आहे. इथेनाॅल निर्मितीकडे जाणारी साखर 15 लाख टन असू शकते. प्रत्यक्षात साखरेच्या उत्पादनाचा अंदाज 94 लाख टन असू शकताे.