Radhakrishna Vikhe Patil :महाराष्ट्र राज्यातील काॅंग्रेसमधील धुसफूस सुरूच आहे. मनाेमिलन झाल्याचे दिसते, परंतु वरिष्ठ नेत्यांमध्ये वर्चस्व आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरूच आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्याविरुद्ध झालेल्या कुरघाेड्या आणि बाळासाहेब थाेरातांचे नाराजीनाट्य हे देखील राज्याने जवळून पाहिलं. अशातच भाजपचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी वेगळा खेळी केली आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देऊ केली आहे. या ऑफरमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.
मंत्री विखे यांनी ही ऑफर देताना म्हटले आहे की, अशाेक चव्हाण ज्या पक्षात, त्याचे अस्तित्व आणि भविष्य काय, हे त्यांना देखील माहित नाही. नाशिक पदवीधर मतदार संघात व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक झाली. तिथे पक्षाचा विचार झालाच नाही. पक्षाचा विचारसाठी काॅंग्रेसमधील काेणत्याच नेत्याकडे वेळ नाही. मुख्यमंत्रीपदावर काम केलेले अशाेक चव्हाण एवढेच सक्षम नेते आहेत. त्यामुळे त्यांनी विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्व जगाने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला काेणालाही आवडेल. अशाेक चव्हाण यांनी देखील याबाबत विचार करावा.
अशाेक चव्हाण यांनी या ऑफरवर जाेरदार प्रत्युत्तर दिले आहे. “असा काेणताही विचार नाही”, असे त्यांनी सांगितले आहे. वेळाेवेळी ऑफर देऊन विखे हे माझे मित्र आहे की शत्रू हेच कळत नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले. प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी देखील यावर जाेरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले, “सत्तेसाठी लालची झाले आहे. ज्या काॅंग्रेसने एवढं माेठं केले ते एवढ्या लवकर कसे विसरले”.
