कवी व लेखक विनोद जनार्दन शिंदे लिखित ऋतू प्रकाशन निर्मित ‘नॉट थिंग्ज बट मेन’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शरद कोलते यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्यास सर्व स्तरातील, समाजातील साहित्यिक व रसिक उपस्थित होते.
‘नॉट थिंग्ज बट मेन’ या ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्यानिमित्ताने प्रा. डॉ. शरद कोलते यांनी ‘माणसे’ घडविणारे अहमदनगर कॉलेज, असे आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “या पुस्तकाचे लेखक विनोद शिंदे यांनी व्यक्ती चित्रित करण्याचे उत्तम काम केले. त्यांच्यावर येशू ख्रिस्त तसेच सरस्वतीचा अनुग्रह दिसून येतो. या पुस्तकातील आदर्शवादी व्यक्तिरेखा वाचून भावी पिढी आदर्श निर्माण करेल. विनोद शिंदे एक शांत व अभ्यासू वृत्तीचे व्यक्तिमत्व असून त्यांचे संस्थेवर प्रेम आहे”.

डॉ. सुधाकर शेलार यांनी हे पुस्तक म्हणजे उद्याच्या काळासाठीचा एक ऐतिहासिक दस्तावेज ठरणार आहे. महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षातील वाटचालीत योगदान देणाऱ्या व्यक्ती आपणास या पुस्तकात भेटतात. अशा या माणसांचा सगळा गोतावळा म्हणजे ‘नॉट थिंग्ज बट मेन’ हे पुस्तक आहे.
पत्रकार सुधीर लंके यांनी मिशन व हिवाळे शिक्षण संस्थेने जे काम केले ते येणाऱ्या नवोदित पिढीला योग्य ते मार्गदर्शन करेल. शिक्षण क्षेत्रात मिशन व अहमदनगर कॉलेजचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. चं. वि. जोशी यांनी ‘नॉट थिंग्ज बट मेन’ मधून व्यक्तिचित्रणे किती सकस, स्वभावधर्मासह, सवयी/लकबींसह कशी व किती वैशिष्ट्यपूर्ण असावीत याचा प्रत्यय संपूर्ण पुस्तक वाचताना प्रत्ययास येतो. डॉ. भा. पां. हिवाळे सरांचा ध्येयवाद– ध्यास व संस्था स्थापनेचा प्रवास ज्या विविध लेखांतून सुबद्ध / प्रमाणशीरपणे रेखाटला ते तीन चार लेख वाचल्याशिवाय अहमदनगर कॉलेजचा इतिहास व त्याचे राष्ट्र पातळीवरील कार्य कळणारच नाही. डोळ्यांसमोर साक्षात करणारी शैली लेखकाला आत्मसात असल्याने हे सारेच लेख व व्यक्तिरेखा कमालीच्या यथार्थ ठरतात, असे म्हणाले.
जयंत येलूलकर यांनी विनोद शिंदे यांच्यात आमच्या शहराचा चेहरा दिसून येतो. आज माणसांचा एकमेकांवरचा विश्वास उडत चालला आहे. कोणी कोणाविषयी चांगले बोलायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे माणसांचे स्वभाव चित्र रेखाटण्याचे काम समाजाला नवी उर्जा देणारे ठरते. म्हणूनच अहमदनगर कॉलेजने जे मानवतेचे रोपटे लावले ते जतन करण्याची गरज आहे. सर्वच मान्यवर व्यक्तींनी विनोद शिंदे यांच्या योगदानाचे व लेखन शैलीची मनापासून प्रशंसा केली आहे, असे सांगितले.
विनोद शिंदे यांनी आपल्या मनोगतात डॉ. भा. पां. हिवाळे व अहमदनगर कॉलेज यांच्या बाबतीत समग्र संपादन व्हायला हवे होते. त्यातून पी.एचडीच्या अनेक संशोधक अभ्यासकांना त्यावर प्रबंध सादर करता आला असता ही खंत व्यक्त केली. ‘नॉट थिंग्ज बट मेन’ या पुस्तकात एकूण 136 वर्षांच्या कालखंडास स्पर्श करण्यात आला आहे. अहमदनगर कॉलेजने जे उत्तुंग व्यक्तिमत्व निर्माण केले, घडविले त्यातून कॉलेजचे महात्म्य विदित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे सांगितले.
विश्वास शिंदे, अभिषेक शिंदे व शिंदे मित्र मंडळींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. अर्पिता शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.