“ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नव्हता, अशा जगातील बलाढ्य इंग्रज सत्तेची मालकीन क्विन एलिझाबेथ. अहमदनगरच्या सत्ताधारी सुलताना चांदबीबी या समकालीन राज्यकर्त्या होत्या. जगात त्याकाळी मोजक्याच महिला सत्ताधारी होत्या. चांदबीबी यांचा मृत्यू झाला त्यावेळी मोगलांना त्यांच्या पायातील एक सँडल मिळाला. त्याची त्यावेळी किंमत तीन लाख रूपये होती. तो सँडल सध्या फ्रान्स येथील संग्रहालयात आहे. दोन्हींची किंमत एकूण सहा लाख रूपये होती आणि त्याचवेळी एलिझाबेथ राणीच्या मुकूटाची (ताज) किंमत ही चांदबीबी यांच्या सँडलच्या किंमतीपेक्षा फार कमी होती. अहमदनगरचे वैभव, असे भव्यदिव्य होते. त्याचबरोबर आपल्या भूमीने सर्व स्त्रियांचा वेळोवेळी सन्मान आणि गौरव केलेला आहे. या भूमीत सुलताना चांदबीबी बरोबरच राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, शिक्षण प्रसारक मिसेस सिंथिया फेरार, सावित्रीमाई फुले, फातिमा शेख, हिराताई भापकर, जानकीबाई आपटे अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. या भूमीने येथे असलेल्या सर्व धर्मांचा आदर केलेला आपणास दिसून येत आहे. हिच आपली ‘गंगा-जमुना’ संस्कृती जगात प्रसिध्द आहे. तिचा सर्वत्र आदर केला जातो”, असे गौरवोद्गार इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष असिफखान दुलेखान यांनी काढले.
औरंगाबादचे मरहूम डॉ. मिर्झा मोहम्मद खिज़र यांनी लिहलेल्या ‘सुलताना चांदबीबी’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ चांदबीबी यांच्या स्मृतिदिनी आयोजित करण्यात आला होता. रहेमत सुलतान हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात मंचावर प्राचार्य सय्यद सैफअली सफीऊद्दीन, प्राचार्य अब्दुल क़ादिर गुलाम शेख, प्रा. डॉ. अजिज अंबेकर, सय्यद बहार अंजुम, युनूस तांबटकर, रैयान अली फारूक़ी, मिर्झा फैजानअली मोहम्मद खिज़र आदी उपस्थित होते.
सुलताना चांदबीबी यांच्यावर लिहलेल्या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकला शिक्षक तथा प्राचार्य ए. के. शेख म्हणाले, “समाजाने सामाजिक कामात पुढाकार घ्यावा. ज्यांची ऐपत आहे, त्यांनी रहेमत सुलतान हॉलसारखे समाजाला उपयोगी पडेल असे काम करावे. आर्थिक ऐपत असणारांनी ऐपत नसणारांच्या पाठीशी उभे रहावे. समाजात सांस्कृतिक कार्याची फार मोठी गरज असून ते सतत व्हावेत”. सय्यद बहार अंजुम यांनी डॉ. खिज़र यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांच्यासोबत केलेल्या ऐतिहासिक कार्याची ओळख करून दिली.

ग्रंथप्रकाशन कार्यक्रमानंतर अहमदनगरचे अभिमान असलेले प्राचार्य सय्यद सैफअली सफीऊद्दीन यांना त्यांनी केलेल्या ऐतिहासिक, सामाजिक लिखाणाबद्दल अखंड अहमदनगरकरांच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यावतीने चिरंजीव सय्यद शफाकत यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी इतिहासप्रेमी मंडळ आणि अखंड अहमदनगरकरांचे आभार मानले. प्राचार्य सय्यद सैफअली सफीऊद्दीन यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे गुबारे खातीर, डॉ. अल्लामा इक्बाल यांचे जर्बे कलrम, अहमदनगरचे अपर जिल्हाधिकारी खान मुन्शी अब्दुल कादिर यांचे तारीख-ए-अहमदनगर दक्कन यासह अनेक ग्रंथांचे भाषांतर करून सर्वसामान्यांना ज्ञान उघड करून दिले.
प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी प्रस्तावना व गौरवपत्राचे वाचन केले. आनंद शितोळे, विवेक खोसे, प्रकाश झावरे, शेख शाकीर, संजय झिंजे, उबेद शेख, रविंद्र सातपुते,ॲड. श्याम असावा, मुश्ताक सय्यद, आबिद शेख, शाकीर शेख, मतीन सय्यद, वाहिद आंबेकर, भूषण देशमुख, प्रा. नवनाथ वाव्हळ, ॲड. गफ्फर शेख, वसीम सय्यद, साबीर अली, अतिक शेख,अल्ताफ सय्यद, झैद सय्यद, अशोक सब्बन आदी उपस्थित होते. सय्यद समी, अभिजीत एकनाथ वाघ, सतीश सातपुते, संध्या मेढे, फिरोज शेख, सय्यद वसिम यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
यावेळी इतिहास वस्तू संकलक सचिन डागा यांच्या ‘अहमदनगरची नाणी’ हा चलन संग्रह इतिहास प्रेमींना पाहण्यासाठी ठेवला होता. सय्यद वहाब यांनी सूत्रसंचालन केले. भैरवनाथ वाकळे यांनी आभार मानले.