राज्यात तलाठी भरती परीक्षा 14 सप्टेंबरला संपली. राज्यात 8 लाख 64 हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली. निकाळ दिवाळीपूर्वी लावण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. मात्र सुरूवातीपासून तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आराेप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केले आहे. या समितीने आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निकालाची अपेक्षा असतानाच आता परीक्षेच्या निकाला स्थगिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
राज्यात तलाठी पदासाठी 10 लाख 41 हजार उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले हाेते. मात्र अनेक केंद्रावरून परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी समाेर आल्या आहेत. तसेच हायटेक काॅपीचा प्रकार देखील झाला. यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आक्रमक झाली आहे. समितीचे नीलेश गायकवाड यांनी तलाठी भरतीतील गैरप्रकार आणि इतर नाेकर भरतीमधील पेपरफुटीबाबत अनेक पुरावे असल्याचे म्हटले आहे.
स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी सरकारला वारंवार विनंत्या केल्या आहेत. तशी निवेदने दिली आहे. तरी देखील सरकारने यावर उपाययाेजना केलेल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने वकील मनाेज पिंगळे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयात काय निर्णय हाेईल, याकडे आता आमचे लक्ष लागले आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी दाखल अर्जांपैकी छाननीत 4 हजार 466 जागांसाठी 10 लाख 713 अर्ज वैध ठरले. त्यापैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. या उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा असल्याचे समन्वय समितीने म्हटले आहे.