स्टँडर्ड चार्टर्ड बँक, भारतीय लष्कर, राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) आणि बिगर सरकारी संस्था भूमी या सर्वांनी हिरवागार भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी प्रोजेक्ट ट्रीडम अंतर्गत तीन ठिकाणी दहा लाख देशी झाडे लावली आहेत. या पायाभरणी उपक्रमांतर्गत, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पडीक जमिनीवर (5 लाख), अरवली पर्वतरांगेतील (पृथ्वीवरील सर्वात जुने भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांपैकी एक असलेले) दिल्लीजवळील मानेसर येथे (3 लाख) आणि कोरड्या वालुकामय प्रदेश असलेल्या राजस्थानमधील जोधपूर (2 लाख) या ठिकाणी हे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
वृक्षारोपण करण्यात आलेली मूळ प्रजातींची झाडे अधिवास निर्माण करण्यास, जैवविविधतेला चालना देण्यासाठी, मातीचे आरोग्य आणि गुणवत्ता सुधारण्यास, जमिनीचा ऱ्हास थांबविण्यास, जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्यास त्याचबरोबर तीव्र जलचक्राद्वारे शुद्ध पाणी पुरवण्यास मदत करतील. अरवली टेकड्यांमधील उच्च पातळीच्या नैसर्गिक विवरे आणि विघटनांमुळे ही पर्वतरांग भूजल पुनर्भरणासाठी एक उत्कृष्ट भूभाग आहे. हा भाग संवेदनशील विभागात गणला जातो, कारण या पट्ट्यात भूजलाच्या भरणापेक्षा तिप्पट पटीने पाणीउपसा केला जातो. दमट उष्ण कटिबंधात वृक्षारोपण करण्यात आलेल्या बहुउद्देशीय आणि अत्यंत प्रतिरोधक झाडांमुळे जैवइंधनासाठी तेलाचे उत्पादनही वाढेल, त्याचबरोबर पशुधनाच्या आहारासाठी मोठ्या प्रमाणात खाद्यपेंड उपलब्ध होईल.
तसेच विषम परिस्थितीतही अल्प देखभाल करावी लागणार असल्याने कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होऊन शून्य कार्बन वातावरण (नेट झिरो एन्व्हायरमेंट) च्या दिशेने प्रगती होईल. हवामान बदलाच्या नकारात्मक प्रभावांना तोंड देण्यासाठी वृक्षारोपणाव्यतिरिक्त, सात जलस्रोत पुनर्संचयित करणे आणि सांडपाण्यापासून जलस्रोत निर्माण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. तलाव आणि तीव्र पाणीउतारांचे निर्जंतुकीकरण करणे; तलाव खोदणे आणि समतल करणे; पावसाचे पाणी पाणलोट आणि सरोवराचे उतार / बंधाऱ्यात अडविणे आणि सुरक्षित साठा तयार करणे; पाणलोट क्षेत्रात उताराची निर्मिती, पक्षांसाठी निवास बेटे, घरटी उभारणे तसेच प्रजनन क्षेत्रे तयार करणे ही कामेसुध्दा या प्रकल्पात हाती घेण्यात येणार आहेत. याआधीही 2022 मध्ये, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि भूमीने अरवली पर्वतरांगांमधील मानेसर एनएसजी कॅम्पस परिसरात 45 दिवसांत विक्रमी 1.58 लाख झाडे लावली होती.
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या भारत आणि दक्षिण आशियाच्या विभागप्रमुख झरीन दारूवाला म्हणाल्या, “ वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि जलसंचय पुनर्संचयित करण्यावर समर्पित लक्ष केंद्रित करत पर्यावरण संरक्षणाप्रती आमची सर्वात मोठी बांधिलकी असल्यामुळे बँकेसाठी प्रोजेक्ट ‘ट्रीडम’ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या त्रिस्तरीय उपक्रमाद्वारे, आम्ही हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हरित कवच वाढवून त्याचबरोबर भूजल पातळी वाढवून सकारात्मक आणि दृश्यमान परिणाम घडवून आणत समुदायांसाठी योगदान देण्याचे काम करत आहोत, जे विद्यमान आणि भावी पिढ्यांसाठी एक महत्त्वाची गरज आहे.”
एमआयसी अॅण्ड एस अहमदनगर कमांडचे ब्रिगेडिअर रसेल डिसोझा म्हणाले, “ मॅकेनाइज्ड इन्फंट्री सेंटरच्या पडीक जमीन विकास प्रकल्पामध्ये वनस्पती आणि जीवसृष्टी वाढवण्यात स्टँडर्ड चार्टर्ड बँक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अहमदनगर येथील प्रकल्पाने गेल्या तीन दशकांमध्ये मूर्त पर्यावरणीय बदल घडवून आणले आहेत आणि प्रोजेक्ट ट्रीडममुळे या प्रकल्पाला आणखी पाठबळ मिळण्याची तसेच त्यात भर पडण्याची खात्री आहे.”
भूमीचे सहसंस्थापक डॉ. प्रल्हाथन (Prahalathan) म्हणाले, “आम्हाला ही अपवादात्मक संधी दिल्याबद्दल मी सर्व लष्करी अधिकारी आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचा आभारी आहे. वृक्षारोपण आणि जनपुनर्संचयन करणे ही समुदाय कल्याणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता वाढवते. आम्ही भूमी संस्थेत, आमच्या सर्व उपक्रमांमध्ये शाश्वत पद्धतींच्या एकत्रिकरणातून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत”.