केंद्रीय सहकार मंत्रालयाने बहुराज्य सहकारी संस्थांसाठी जे नवीन नियम प्रस्तावित केले आहेत, त्यानुसार भविष्यात बहुराज्य पतसंस्थांचे कामकाज बँकांप्रमाणे चालणार आहे. या नव्या नियमांची माहिती राज्यातील बहुराज्य पतसंस्था चालकांना व्हावी, यासाठी पार पडलेले चर्चासत्र फार उपयुक्त ठरणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाने जरी केलेल्या मसुद्यावर संस्थांची मते मागवली आहेत. या चर्चासत्रात सर्वांनी मिळून घेतलेले निर्णय मांडण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेवून सदरील नियमात योग्य ते अपेक्षित असलेले बदल यावर मत मांडणार आहोत. तसेच राज्यातील मल्टीस्टेट पतसंस्थांच्या ज्या मागण्या आहेत, त्याही त्यांच्याकडे मांडणार आहे. राज्यातील पतसंस्था चळवळ ही देशात आदर्शवत आहे. ही चळवळ अधिक निकोप व पारदर्शी व्हावी, यासाठी मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन विविध उपक्रमांद्वारे काम करत आहे, असे प्रतिपादन मल्टीस्टेट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केले.
केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने बहुराज्य सहकारी संस्थांसाठी प्रस्तावित केलेल्या नव्या नियमांची सविस्तर माहिती व्हावी यासाठी मल्टीस्टेट पतसंस्था फेडेरेशनच्यावतीने अहमदनगर येथे राज्यस्तरीय चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रास महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे 148 पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. चर्चासत्राचा समारोप फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केला. यावेळी फेडरेशनचे संचालक कडूभाऊ काळे, शिवाजीराव कपाळे, विठ्ठलराव वाडगे, अजिनाथ हजारे, समीर सराफ, रोहन देशमुख, रवींद्र कानडे, जयसिंह पंडित, जयराजे निंबाळकर, किरण भंडारी, अमित फिरोदिया, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी अनेक तज्ञांनी मार्गदर्शन केले.
सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे बहुराज्य सहकारी संस्था कामकाज करताना बँकिंग प्रणालीचे धोके कमी करण्यासाठी तसेच ठेवीदारांचे व सभासदांचे हित जोपासत बँकिंग प्रणाली अधिक सदृढ करण्यासाठी अर्बन बँकांप्रमाणे हे नवे नियम बहुराज्य सहकारी संस्थांसाठी प्रस्तावित केले आहेत. चर्चासत्राचे प्रस्ताविक संचालक कडूभाऊ काळे यांनी केले. सनदी लेखापरीक्षक मोहसीन शेख यांनी सोप्या भाषेत सदर परिपत्रकाचे मराठी अनुवाद करून समजावून सांगितले. चर्चासत्रामध्ये गोदावरी अर्बन मल्टीस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी उपस्थितीच्या प्रश्नांना समर्पक व समाधानकारक उत्तरे देत शंकांचे समाधान केले. संचालक शिवाजीराव कपाळे यांनी आभार मानले.