अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटी यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई येथील सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट यांच्या सहयोगाने 6 व 7 ऑक्टोबरला सीएसआरडी संस्थेत सदाशिव अमरापूरकर राष्ट्रीय डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सीएसआरडी’चे संचालक डॉ.सुरेश पठारे, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटीचे पदाधिकारी रवी डिक्रुझ, निखिल कुलकर्णी, चंदना गांधी व पूजा पटनाईक तसेच सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टच्या रीमा अमरापूरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर निर्णय झाला.
समाजातील दुर्लक्षित असलेल्या सामाजिक समस्यांबद्दल लोकशिक्षण व जागरुकता निर्माण करण्याची क्षमता डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्ममध्ये असते. प्रभावी कथाकथनाद्वारे उपेक्षित समुदायासमोरील आव्हानांबाबत समाज प्रबोधन करणाऱ्या शॉर्ट फिल्म व डॉक्युमेंटरी समाजाचे प्रश्न व समस्या मांडणारे प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जातात. सदाशिव अमरापूरकर यांच्या सेवा कार्याला अभिवादन म्हणून सामाजिक समस्यांप्रती संवेदनशील असलेल्या उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांच्या एक व्यासपीठ प्रदान करण्याच्या व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 6 व 7 ऑक्टोबर रोजी सीएसआरडी संस्थेत सदाशिव अमरापूरकर डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सामाजिक समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे हे फेस्टिवलचे मुख्य ध्येय असल्याने सामाजिक प्रश्नांबाबत समाजभान जपणाऱ्या नवोदित व उदयोन्मुख फिल्म मेकर्ससाठी आपल्या फिल्म सादरीकरणाची अभिनव संधी असणार आहे. फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका भरून फिल्म युट्युब लिंक द्वारे सादर करणे आवश्यक राहील. फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी 30 सप्टेंब पर्यंत नोंदणी करणे आवश्यक असेल. फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी, सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यांसारख्या विविध श्रेणींमधील उत्कृष्ट फिल्मसाठी पुरस्कार आणि आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
फेस्टिवलमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तसेच इतर कोणत्याही राज्यातील नवोदित फिल्म मेकर्स, महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होवू शकतील. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असून मोठ्या संख्येने फिल्म मेकर्सनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सीएसआरडी’चे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी केले आहे. फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी निखिल कुलकर्णी 9822333888, सॅम्युअल वाघमारे 8788412780, चंदना गांधी 9423792490 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.