Shri Kshetra Madhi Kanifnath Temple ः पाथर्डीतील श्री क्षेत्र मढी कानिफनाथ देवस्थानच्या परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मढी देवस्थानच्या चार कर्मचाऱ्यांना आज चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना मढी येथे घडली आहे. यावेळी झालेल्या मारहाणीच्या वेळी जोरदार दगडफेक झाली. यात एका चारचाकी वाहनाच्या काचा सुद्धा फुटल्या.
देवस्थानचे कर्मचारी अभिषेक बाळासाहेब मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार ते पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मढी देवस्थानने तीन वर्षांपूर्वी कानिफनाथ मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास बंदी घातली होती. या निर्णयावरून पूर्वी वादही झाले होते. चालू वर्षी सुद्धा मंदिर परिसरात पशुहत्या करू नका, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी केले होते. यासाठी पशुहत्या विरोधी पथक सुद्धा तैनात करण्यात आले होते.
या पार्शवभूमीवर फिर्यादी अभिषेक मरकड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, देवस्थानचे अध्यक्ष मरकड, दत्तात्रय वसंत मरकड, राहुल अशोक कुटे सोबत असताना आम्हाला दत्तू पाखरे यांच्या शेतात गर्दी दिसली. आम्ही सर्वजण पाखरे यांच्या शेतात गेलो. या ठिकाणी काही जण एकत्र उभे होते. तिथे एक बोकड कापण्यासाठी आणला होता. त्यांना या ठिकाणी पशुहत्या करू नका, असे आम्ही सांगितले. या बोकडाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी आम्ही नवस केला असून आम्ही बोकड कापणारच असे सांगितले. यानंतर त्यातील एकाने मला चाकूने मारहाण केली. इतरांनी माझ्या समवेत असलेल्या जगदीश धाडगे, राहुल कुटे, प्रवीण ढवळे यांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.