Nagar AMC News ः अहमदनगर महापालिकेच्यावतीने लोकसभा निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बैठक घेत विविध संघटनांशी चर्चा केली. मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी नगर शहरातील तृतीयपंथीयांना 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.
नगरमधील तृतीयपंथीयांच्या प्रमुख काजलगुरु यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार, असे आश्वासन दिले. काजलगुरु आणि त्यांचे सहकारी यांनी 100% मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंढे, सहायक आयुक्त सपना वासवा, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजन, सुनील खलचे, किरण उजागरे व कर्मचारी उपस्थित होते.
आम्ही कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याबाबत सर्वांनी सामूहिक शपथ घेतली. संकल्प कलश उपक्रमाची यावेळी सुरवात करण्यात आली. नगर शहरात महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मतदान राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.