Ahmednagar News ः अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण नंदनवन लॉन्स या ठिकाणी झाले. अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण ” मै भारत हूँ ” असे 15 सेल्फी पॉईंट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते. सिद्धाराम सालीमठ (जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी)यांनी या प्रदर्शनास भेट दिली असता त्यांना देखील सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.प्रदर्शनाचे कौतुक करत विविध सेल्फी पॉइंटवर त्यांनी स्वतः फोटो घेत माहिती देखील घेतली.यावर असलेले क्यूआर कोड स्वतःच्या मोबाईल मध्ये स्कॅन करून अनुभव देखील घेतला.
अहमदनगर जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या सेल्फी पॉईंटवर “आपले मतदान 13 मे रोजी आहे. एक वोट सेल्फी तो बनता है , मै भारत हॅू .. मै मेरे लिये मतदान करूँगा , मी महाराष्ट्र आहे .. मी माझ्यासाठी मतदान करणार,मी अहमदनगर आहे… मी माझ्यासाठी मतदान करणार तसेच रिश्ते मे तो हम तुम्हारे भारतीय लगते है .. नाम है अहमदनगर के मतदार,आमचं अहमदनगर भारी .. आमचं मत भारी ..13 मे रोजी आमचं मतदान पण भारी ” अशा आकर्षक घोषवाक्यांनी मतदारांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.एकी नावाची मुंगी,तसेच १३ मे या शब्दांच्या विशिष्ट आकारातील सेल्फी पॉईंट्स अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
आपले नाव मतदार यादीत शोधा ,आपले मतदान केंद्र शोधा ,अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचे उपक्रम पहा व आपले सेल्फी फोटो व्हाट्सअप क्रमांकावर अपलोड करा अशा चार प्रकारच्या संकल्पनांचे चार क्यु आर कोड तसेच भारत निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या चार ॲप ची माहिती देखील क्युआर कोड स्वरूपात सेल्फी पॉइंट वर देण्यात आली होती.हा उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवला जाणार आहे.
उपक्रमासाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी),मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक),बाळासाहेब बुगे(उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार) , डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत)व सर्व स्वीप समिती सदस्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले.