प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (वय 57) यांनी घेतलेल्या गळफास प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. खालापूर पाेलिस ठाण्यात कलम 306 (34) अंतर्गत गुन्ह्याची नाेंद करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्यानुसार पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
नितीन देसाई हे त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेतल्याच्या स्थिती आढळले हाेते. देसाई यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये माेठी खळबळ उडाली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कलाकृतींनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचा मृत्यू सर्वांनाच चटका लागून गेला आहे. देसाई यांनी गळफास का घेतला, याची चर्चा सुरू आहे.
देसाई यांच्या गळफासप्रकरणात आता ECL finanace कंपनीच्या एडेलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडप्रकरणी त्यांच्यामागे तगादा लावण्यात आला हाेता. त्यांना मानसिक छळ केला जात हाेता. याच त्रासाला कंटाळून त्यांनी गळफास घेतल्याची तक्रार नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी पाेलिसांकडे दिली आहे.