Ahmednagar Political : नीलेश लंके यांनी आपल्या पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवून देत, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकले आहे. आमदारकीचा राजीनामा देताना नीलेश लंके यांनी अगोदर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली आहे. अजितदादा मला नक्की माफ करतील आणि मला समजावून घेतली, असे म्हणताच नीलेश लंके यांना हुंदका फुटला. त्यांच्या खूप पैसा आहे. यंत्रणा आहे. पण माझ्यासोबत जनता आहे. मी त्यांची दडपशाही संपविण्यासाठी मैदानात उतरलो आहे, असे म्हणत नीलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. संतोष इथापे अध्यक्षस्थानी होते.
नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काल सुपा (ता. पारनेर) येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासह नगर, पुणे, बीड, मुंबईतील कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित होते. या मेळाव्यात नीलेश लंके यांनी तब्बत दीड तासापेक्षा अधिक वेळ भाषण केले. कार्यकर्तांसमोर भावना मांडल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे त्याचे पुत्र खासदार सुजय विखेंसह त्यांना मतदात करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी जनतेसाठी आमदार झालो आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. कोविडमध्ये जीवाची पर्वा न करता लोकांबरोबर उभा राहिलो. विधानसभेत मी आनंदात होतो. पण यांनी त्रास देण्याचे काम केले. यांनी निधी अडविला. राहात्याला पाचशे कोटी आणि पारनेरला निधी मिळवण्यासाठी करत असलेल्या पत्रांना फेकून देण्यात येत होते, अशी टीका नीलेश लंके यांनी केली.
ही यंत्रणेची एवढी दहशत आणि दडपशाही आहे की, काही करतात. पीएला पीए आहे. चमच्याला चमचा आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्रास देतात. नगर दक्षिणेत अनेकांना त्रास दिला आहे. काही अधिकाऱ्यांना निलंबित देखील केले आहे. हा अन्याय किती दिवस सहन करायचा आहे. आता नाही. कम से कम दोन लाख.., मतांनी विजय मिळवायचाच. मॅनेज तर बापाचनी देखील होणार नाही. हे लोकांना ठाऊक आहे. होऊनच जाऊ दे, असे म्हणत नीलेश लंके यांनी विखे पिता-पुत्रांना आव्हान दिले.
काही झाले, तरी उत्तरेला घेऊन जाण्याची यांची सवय आहे. पंतप्रधान आले ते उत्तरेला. संरक्षणमंत्री आले ते उत्तरेला. अमित शहा आले ते उत्तरेला. पशुसंवर्धन प्रदर्शन उत्तरेला. शासन आपल्या दारी उत्तरेला. हे नगर दक्षिणचे खासदार आणि काम नगर उत्तरेला हे पटत नाही. नगरच्या जनतेला देखील कसे पटते हे देखील कळत नाही. आता बस्स. हेलिकाॅप्टरमध्ये फिरणाऱ्यापेक्षा गाऊंडवर पाय ठेवून फिरणारा माणूस तुमच्यात येत आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे चिंता नाही. फक्त कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी कामाला लागावे. हात जोडून मतदारांना मतदानापर्यंत घेऊन जावे. विजय आपल्याच आहे, असे उत्साह देखील नीलेश लंके यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, टिळक भोस, माजी महापौर अभिषेक कळमकर, सुदाम पवार, सतीश पालवे, रियाज पठाण, अर्जुन भालेकर, बाळासाहेब हराळ, राहुल झावरे यांची यावेळी भाषणे झाली.