Crime News ः नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांनीवर अत्याचार आणि त्यानंतर तिच्या मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या घटनेतील तपासात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नसून, वेगाने तपास करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “अनेक वर्षांपासून पाहाता आले आहे की, शाळेत जाणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे भीती दाखवून किंवा फुस लावून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटना घडतात. संगमनेरमधील घटना देखील अशीच काहीशी आहे. उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याशी घटनेवर तपशीलवार चर्चा झाली आहे”. या घटनेमध्ये दोषारोपपजत्र योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावे आणि आरोपींवर कडक शिक्षा लागेल, अशी कारवाईच्या सुचना केल्या आहेत. अशा घटना घडणार नाही, याबाबत मुलींसाठी शालेय शिक्षण विभागाने जो कार्यक्रम हाती घेतला आहे, त्याचा सुद्धा उपयोग ठिकठिकाणी झाला पाहिजे. यासाठी शालेय विभागाने देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले.
संगमनेरमधील साकुरी येथे ही घटना २९ फेब्रुवारीला घडली होती. मयत पीडित अल्पवयीन मुलगी ही दहावीत शिक्षण घेत होते. परिक्षेचे परिक्षा केंद्रावरील प्रवेशपत्र घेण्यासाठी शाळेत आली होती. त्यावेळी तिच्यावर पाच जणांनी अत्याचार केला. या घटनेची समाजात वाच्यता झाल्यावर आपल्याला खूप त्रास होईल, या भीतीतून पीडिताने आत्महत्या केली. परंतु काल या घटनेला वाचा फुटली. सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर (दोघे रा. हिरेवाडी, साकुर), प्रशांत भास्कर खेमनर (रा. भडांगे वस्ती, साकुर), विकास रामदास गुंड (रा. गुंड वस्ती, मांडवे बुद्रुक), विजय खेमनर (रा. हिरवाडी, साकुर) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही दहावीच्या परिक्षा केंद्राचे प्रवेशपत्र घेण्यासाठी शाळेत आली होती. त्यावेळी सौरभ खेमनर याने तिला बळजबरीने रुबाब पान शाॅपमध्ये नेले. तिथे त्याच्या तोंडाला रुमाल बांधला. दोन्ही हात बांधून तिच्यावर अत्याचार केला. यासाठी सौरभला अन्य चौघांनी मदत केली. सौरभ खेमनर हा मुलीवर अत्याचार करत असताना योगेश खेमनर याने पान शाॅपचे शटर बंद करून कुलूप लावून घेतले. प्रशांत खेमनर आणि विजय खेमनर हे पान शाॅपबाहेर देखरेख करण्यासाठी बसून होते. यावेळी तिथे बाजीनाथ दातीर आला. त्यावेळी त्याला या दोघांनी निघून जाण्यास सांगितले. या प्रकाराचा पीडितेवर आघात झाला. तिने तेथून घरी आल्यावर विषारी द्रव्य घेतले. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.